बॉलिवूडमध्ये सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांचे कोणतेही सिनेमे आले आणि त्यावर वाद झाला नाही असे तर क्वचितच झाले असेल. आता याच इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. एका ट्रस्टने आता ‘दंगल’ सिनेमाच्या गाण्यावर आक्षेप घेतला आहे. ‘हानिकारक बापू’ या गाण्यावर त्यांना आक्षेप आहे. ‘हानिकारक बापू’ या गाण्यातील ‘हानिकारक’ या शब्दावर विश्वात्मक सामाजिक ट्रस्टला आक्षेप आहे. त्यामुळे या गाण्यातून बापू हा शब्द काढून टाकावा अशी मागणी त्यांनी केली आहे. शिवाय आमिर खान याच्या विरोधात शांतता मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. महात्मा गांधींना ‘बापू’ म्हणून संबोधले जाते. असे असताना या शब्दासोबत ‘हानीकारक’ शब्द जोडला जाणे गैर आहे, असे ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रशेखर स्वामी यांनी म्हटले आहे. हा शब्द गाण्यातून गाळला जावा अन्यथा याविरोधात शांतता मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

‘दंगल’ या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबाबतची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचत आहे. या सिनेमामध्ये आमिर खान कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या भूमिकेतून एका महत्त्वाकांक्षी वडिलांची व्यक्तिरेखा साकारत आहे. तसेच आमिरच्या मुलींच्या भूमिकेतून अभिनेत्री सान्या मल्होत्रा आणि फातिमा शेख प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटासाठी अभिनेता आमिर खान आणि त्याच्या ऑनस्क्रिन मुलींनी चांगलीच मेहनत घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये खिळवून ठेवण्यासाठी कलाकारांनी चांगलाच घाम घाळला आहे. आमिरचा महावीर सिंग फोगट बनण्यापर्यंतचा प्रवास इतकाही सोपा नव्हता हेच खरे. या सिनेमाच्या ट्रेलरला चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्यानंतर या सिनेमातील ‘हानिकारक बापू’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. हो गाणेही चांगलेच गाजले.

नितेश तिवारी दिग्दर्शित या सिनेमामध्ये रसिकांना आमिर खान विविध रुपांमध्ये दिसणार आहे. आमिरसोबतच अभिनेत्री साक्षी तन्वर या सिनेमामध्ये महावीर सिंग फोगट यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. ‘म्हारी छोरिया छोरोसे कम है के?’, असे म्हणणारा आमिर खान या सिनेमाद्वारे २३ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.