बॉलीवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खान याचा चित्रपट येणार म्हणजे तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणार असे एकूणच समीकरण सध्या तयार झाले आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात आमिरचा कुस्तीवर आधारित ‘दंगल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यावर्षात सर्वाधिक कमाई करण्याचा मान पटकाविणाऱ्या या चित्रपटाने तब्बल ५३२ कोटी रुपयांची कमाई केली. पण, या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या आमिरला यातून किती नफा झाला हे कोणाला माहित आहे का?

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, आमिर खानने ‘दंगल’मधून अंदाजे १७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. धक्का बसला ना…. पण तुम्ही जे वाचले ते खरं आहे. आमिर ज्या चित्रपटात काम करतो त्यात तो मानधनाव्यतिरिक्त प्रदर्शनानंतर होणाऱ्या नफ्यातही वाटेकरी असतो. पण, दंगल चित्रपटाची निर्मिती स्वतः आमिर, यूटीव्ही मोशन पिक्चर्स आणि वॉल्ट डिस्ने पिक्चर्स यांनी संयुक्तपणे केली होती. त्यामुळे या चित्रपटाने मिळवलेल्या नफ्यात आमिर हा मोठ्या प्रमाणात वाटेकरू होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नफ्यातील ठरलेल्या भागीदारी प्रमाणानुसार आमिरच्या वाट्याला अंदाजे १७५ कोटी रुपये आले आहेत. चित्रपटासाठी त्याने ३५ कोटी रुपयांइतकी आगाऊ रक्कम स्वीकारली होती. त्यानंतर त्याने चित्रपटाच्या नफ्यातील ३३ टक्के वाटाही घेतला. आमिर त्याच्या प्रत्येक चित्रपटाला प्रदर्शनानंतर होणाऱ्या नफ्यात ३३ टक्के वाटा घेतो. यात सेटलाइट राइट्सचाही समावेश असतो. ‘दंगल’मध्ये आमिर खान व्यतिरीक्त झायरा वसिम, सुहानी भटनागर, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, साक्षी तन्वर यांच्याही भूमिका होत्या. या सर्व कलाकारांनी चित्रपटात तोडीचा अभिनय केला होता. त्यासाठी समीक्षकांपासून ते प्रेक्षकांपर्यंत सर्वांनीच त्यांची प्रशंसा केली होती.

नुकताच आमिरने त्याचा ५२ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी प्रसारमाध्यमांसोबत वाढदिवस साजरा करताना त्याने दंगल गर्ल्सची बरीच प्रशंसा केली. सध्या तो त्याच्या आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या कामात व्यग्र असून यात बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन हेदेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या वर्षाअखेर हा चित्रपट प्रदर्शित होईल.

दरम्यान, आमिर हा चित्रपटांबरोबरच जाहिरातींच्या निवडीबद्द्लही चांगलाच चोखंदळ आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. काही दिवसांपूर्वीच स्टार प्लस वाहिनीच्या एका जाहिरातीत आमिर झळकला होता. सध्या ही जाहिरात स्टार वाहिनीसाठी फार महत्त्वाची ठरत असून अवघ्या काही मिनिटांच्या या जाहिरातीसाठी तब्बल १०० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. केवळ एका जाहिरातीसाठी इतकी मोठी रक्कम खर्च करणे ही काही छोटी बाब नाही. पण, आमिरच्या लोकप्रियतेसमोर ही रक्कमही कमीच आहे असेच म्हणावे लागेल. आता तुम्ही म्हणाल की १०० कोटी रुपये खर्च करण्याचे कारण काय? जाहिरातीसाठीचे कॅम्पेन, होर्डिंग, पोस्टर्स, सोशल मीडियाद्वारे जाहिरातीचा प्रसार या सर्वांसाठी आणि इतर तांत्रिक कारणांसाठी ही कोट्यवधींची रक्कम खर्चण्यात आली आहे. प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा आमिर खान आणि समाजाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कामांमध्ये लागणारा त्याचा हातभार या सर्वांची सांगड घालत बनवण्यात आलेल्या जाहिरातीमुळे वितरक आणि जाहिरातदारांसाठी हे गणित फायद्याचे ठरते.