आमिर खानच्या दंगलला पाकिस्तानमध्ये प्रदर्शित करण्याची परवानगी मिळाली. परंतु, भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजाच्या दृश्यांना कात्री लावण्यात आली. या चित्रपटाबाबत पाकिस्तान सेंसर बोर्डाला कुठलाही आक्षेप नव्हता परंतु भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज दाखवता येणार नाही असे त्यांनी सांगितले. यानंतर भारताच्या राष्ट्रगीताशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही असे आमिरने ठणकावून सांगितले. त्यामुळे हा चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होणार नाही असे वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले आहे.  उरी हल्ल्यानंततर भारतामध्ये पाकिस्तानी कलाकारांची भूमिका असलेले चित्रपट दाखवण्यावर निर्मात्यांनी बंदी घातली होती.

तसेच पाकिस्तानमध्येही भारतीय चित्रपट आणि मालिका प्रदर्शित होण्यावर बंदी घालण्यात आली होती. ही बंदी पाकिस्तानने उठवली होती. दंगलला प्रदर्शनाचे प्रमाणपत्र देण्यास सेंसर बोर्ड तयार आहे परंतु हे दोन दृश्य वगळावे असे सांगण्यात आले. त्यास आमिरने नकार दिला आहे.  हा चित्रपट गीता आणि बबिता फोगाट या दोन कुस्तीपटूंच्या आयुष्यावर आहे. त्यामध्ये आमिरने महावीर फोगाटची भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या शेवटी गीताला जेव्हा सुवर्णपदक मिळते त्यावेळी शिष्टाचाराप्रमाणे भारताचे राष्ट्रगीत वाजलेले दाखवण्यात आले आहे. हे दृश्यच पाकिस्तानने वगळण्याची सूचना केली होती त्यास आमिरने नकार कळवल्याचे सूत्रांनी म्हटले.

दंगलने गेल्या वर्षी सर्वाधिक व्यवसाय केला आहे. दंगलने ३८४ कोटींचा गल्ला जमवल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तानमध्ये जर हा चित्रपट प्रदर्शित झाला तर नक्कीच उत्पन्नामध्ये वाढ होईल. या चित्रपटाचा पाकिस्तानमध्ये १०-१५ कोटी व्यवसाय होईल असा एक अंदाज होता. गेल्या वर्षी पाकिस्तानी कलाकार असलेला एकही चित्रपट भारतामध्ये  प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही असे भारतातील निर्मात्यांनी म्हटले होते. उरी हल्ला तसेच सर्जिकल स्ट्राइकमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती.