बॉलीवूड अभिनेता सोहेल खान याने काही महिन्यांपूर्वीच नवाजुद्दीन सिद्दीकी आणि भाऊ अरबाज खान यांच्यासह गोल्फ खेळावर आधारित फ्रिकी अली या चित्रपटाची निर्मिती केली होती. सोहेलच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी काही कमाल दाखविली नव्हती. पण, हा चित्रपट क्रिडा क्षेत्रावर आधारित असल्याने सोहलने या चित्रपटाचा दुसरा भाग काढणार असल्याची घोषणा केली आहे. खेळांची आवड असल्याने सोहेल आता टॉनी प्रिमीयर लीगशी जोडला गेला आहे. या क्रिकेट शोच्या लाँचला त्याने हजेरी लावली होती. यावेळी त्याने क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, विराट कोहली आणि यांसारख्या खेळाडूंवर बायोपिक बनविण्याची इच्छा व्यक्त केली.

सोहेल म्हणाला की, प्रत्येक युगामध्ये एक लेजेन्ड असतो.  त्यानुसार, वेगवेगळ्या कालावधीत महान खेळाडू आपल्याला मिळालेले आहेत. डॉन ब्रॅडमॅन,  सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, विराट कोहली यांच्या आयुष्यावर सुंदर गोष्टी आहेत. ज्यांना ऐकून आणि पाहून अनेकांना प्रेरणा मिळेल. यापैकी कोणाचीही भूमिका मी निभावू शकेन की नाही हे मला माहित नाही. पण, यांच्यावर मला नक्कीच बायोपिक बनवायला आवडेल. मी यांच्या कथांचे दिग्दर्शन आणि निर्मिती करेन.

सोहेलचे क्रिकेट खेळाविषयी असलेल्या या प्रेमाचे कारण त्याचे वडिल सलीम खान आहेत. आपल्या एका तरी मुलाने भारतासाठी क्रिकेट खेळावे, अशी सोहेलचे वडिल सलीम यांची इच्छा होती. सोहेल म्हणाला की, आपल्या तीन मुलांपैकी एकातरी मुलाने भारतासाठी क्रिकेट खेळावे अशी माझ्या बाबांची इच्छा होती. पण, दुर्भाग्यवश आमच्यापैकी एकही भाऊ क्रिडा क्षेत्रात गेला नाही. मात्र, या खेळाविषयी आम्हाला विशेष आकर्षण  आहे. सलमानला ब-यापैकी क्रिकेट खेळता यायचे. त्यामुळे सलीम यांची त्याच्याकडून जास्तच अपेक्षा होती. पण, तो  क्रिकेट खेळताना तेथे वडिल हजर असले की तो मुद्दामून खराब खेळी करायचा, असेही सोहेलने यावेळी सांगितले.