देशभरातील लोक सध्या करोना विषाणूमुळे त्रस्त आहेत. जगभरात पसरलेल्या या विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुढील २१ दिवस देशात लॉकडाऊन करण्याचा आदेश सरकारने दिला आहे. दरम्यान मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे हिला करोना व्हायरस झाल्याची शंका चाहत्यांना येऊ लागली आहे. त्यामुळे तिला करोना तर झाला नाही ना? असं विचारणारे फोन आता येऊ लागले आहेत.

काय आहे हा प्रकार अभिनेत्रीने सांगितला अनुभव?

अभिज्ञाने इनस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने करोनापासून सावध राहण्याचा सल्ला चाहत्यांना दिला. मात्र त्याचबरोबर करोना संबंधीत एक अनुभव देखील शेअर केला.

“माझी आई १८ मार्चला दुबईहून भारतात परतली. विमानतळावर तिची पूर्ण वैद्यकिय चाचणी केल्यानंतरच तिला घरी सोडण्यात आले. दरम्यान तिला विलगीकरण कक्षात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे आम्ही तिच्यापासून दूर दुसऱ्या घरामध्ये राहू लागलो. परंतु आवाक् करणारी बाब म्हणजे काही लोकांना वाटलं की मलाच करोना झाला आहे. त्यामुळे मी आईपासून वेगळी राहत आहे. कदाचित लोकांना करोना आणि क्वॉरंटाईन यातला फरक समजत नसावा.” असं तिने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. यानंतर तिने करोना आणि क्वॉरंटाईन यातला फरक चाहत्यांना समजाऊन सांगितला.

‘तुला पाहते रे’ या प्रसिद्ध मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिज्ञा या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया आहेत. काही जणांनी तर तिला करोनापासून सुरक्षित राहण्याचा सल्ला देखील दिला आहे.