मेघना गुलझार दिग्दर्शित ‘राजी’ सिनेमाला समिक्षकांकडून आणि प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. सहमत नावाच्या एका असामान्य मुलीची कहाणी हरिंदर सिक्का लिखित ‘कॉलिंग सहमत’ या पुस्तकात मांडण्यात आली आहे. सहमतचे लग्न पाकिस्तानी लष्कर अधिकाऱ्याच्या मुलाशी होते. त्यानंतर तिच्या आयुष्यात काय होते हे तर साऱ्यांनीच सिनेमात पाहिले आहे. या सिनेमात सहमतच्या पहिल्या प्रेमाची कुठेही वाच्यता केलेली नाही. पण तुम्हाला माहित आहे का की सहमतच्या पहिल्या प्रेमाचे नाव अभिनव आहे. सहमत या जगात नसली तरी अभिनव अजूनही दिल्लीत वास्तव्यास आहेत. सहमतसोबत असलेल्या नात्याबद्दल अभिनव यांनी अनेकांसमोर मन मोकळं केलं आहे. हरिंदर सिक्का यांच्या पुस्तकातही अभिनव यांचा उल्लेख त्यांच्या मूळ नावानेच आहे.

पुस्तकात अभिनव हे त्यांचे मूळ नाव नसून काल्पनिक नाव आहे. सिनेमात सहमतच्या फक्त एकाच प्रेमावर अर्थात देश प्रेमावर लक्ष केंद्रीत केलं गेलं आहे. पण त्यांच्या दुसऱ्या प्रेमाची, अभिनव या उंचपुऱ्या अॅथलिटची सिनेमात वाच्यताही केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सहमतची अभिनवशी ओळख दिल्ली विद्यापीठात झाली होती.

आता कुठे राहतात अभिनव?

सहमत या जगात नाही, पण अभिनव अजूनही जिवंत असून दिल्लीत राहत आहेत. काही दिवसांपूर्वी लेखक हरिंदर सिक्का यांनी सहमतची खरी ओळख जगाला करुन देण्याचे ठरवले होते. सिक्का सहमतचा खरा फोटो जगाला दाखवणार होते. मात्र अभिनवने त्यांना असे न करण्यास सांगितले. फक्त अभिनवच नाही तर सहमतचे जवळच्या सर्व मित्र- परिवारानेही या गोष्टीला मान्यता दिली नाही. एवढेच नाही तर जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनीही तिची खरी ओळख जगाला कळू नये म्हणून हरिंदर यांना पत्र लिहिले.

‘लाखो लोक आहेत जे दररोज भारतासाठी लढतात आणि त्याच्यासाठी दररोज प्रार्थना करतात. कश्मिरी लोक फार साधे आणि शांतताप्रिय आहेत. ज्यांनी जम्मू- काश्मीरला भेट दिली आहे त्यांना कश्मिरी लोकांच्या खरेपणाबद्दल खात्री पटेल.’ अशा आशयाचे पत्र अब्दुल्ला यांनी सिक्का यांना लिहिले होते.

अखेर सिक्का यांनी अभिनवचा मान राखत सहमतची खरी ओळख कोणाला कळू नये याची काळजी घेतली आहे. पण आजही ते या आशेवर आहेत की एकदिवस अभिनव किंवा सहमतच्या जवळील व्यक्ती त्यांना सहमतची ओळख जगाला करुन देण्यास सांगतील. सिक्का यांनी अभिनवबद्दल माहिती देताना म्हटले की, ‘सध्या ते दिल्लीमध्ये राहत आहे आणि मी त्यांच्या खासगी आयुष्यात दखल देत असल्याचे त्यांना वाटत आहे. पण मला त्यांना एक साधा प्रश्न विचारायचा आहे की, खरंच सहमत ही फक्त एक व्यक्ती होती का? ती आता देशाची संपत्ती आहे. ती देशाची खरी नायक आहे.’

सिक्का पुढे म्हणाले की, ‘एकीकडे सहमत देशासाठी काम करत होती. तर दुसरीकडे अभिनवचे सहमतसाठीचे प्रेम कमी झाले नाही. सहमत भारतात परतल्यावर अभिनवकडे कधीच गेली नाही. उलट अभिनवच सहमतकडे आले. सहमत भारतात परतल्यावर अभिनवने तिची सर्वप्रकारे काळजी घेतली. सहमत गरोदर होती आणि त्यात ती नैराश्यात होती. आपल्या जुन्या आयुष्यात वळण्यासाठी तिच्याकडे कोणतेही कारण नव्हते.’

आजही सिक्का सहमतची खरी ओळख जगाला करु इच्छितात. त्यांच्या मते, अशा हिंमती मुलींची जगाला ओळख करुन देऊन आपण नवा पायंडा घालू शकतो. सामान्य जनतेला अशाही लोकांची ओळख व्हावी जे कोणतीही पर्वा केल्याशिवाय देशासाठी एवढा मोठा त्याग करतात. देशासाठी जीव जोखमीत टाकणाऱ्या आपल्या हिरोंना ओळखीविना मरण का मिळतं? त्यांच्या साहसाची गोष्ट सांगितली जाते पण त्यांना का ओळख मिळत नाही? असा सवाल सिक्का यांनी उपस्थित केला आहे.

‘कॉलिंग सहमत’ हे पुस्तक लिहायला सिक्का यांना जवळपास सात वर्ष लागली. ते स्वतः नौदलाचे अधिकारी होते. सहमतच्या मुलाच्या मदतीने सिक्का सहमतपर्यंत पोहोचले आणि माहिती मिळवली. सहमतने सिक्का यांना स्वतः सांगितले होते की, तिने कशा प्रकारे पाकिस्तानात राहून भारतासाठी काम केले. पण या कामात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. ज्यात तिला स्वतःचा नवराही गमवावा लागला.