बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा भाऊ आणि अभिनेता – दिग्दर्शक अरबाज खान ‘जीना इसी की नाम है’ या चित्रपटात झळकणार आहे. अरबाजचा हा चित्रपट खास असणार आहे. कारण, या चित्रपटाचे चित्रीकरण अमेरिकेतील राष्ट्रपति भवन म्हणजेच व्हाइट हाउसमध्ये होणार आहे.

‘जीना इसी की नाम है’ चित्रपटाचे दिग्दर्शक केशव पानेरी म्हणाले की, व्हाइट हाउसमध्ये चित्रीकरणाची परवानगी मिळवण्यासाठी आम्हाला बराच वेळ थांबावे लागले. आम्हाला परवानगी मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. मी १५ वेळा परवानगी मागितली. तेव्हा कुठे जाऊन मला ही आनंदाची बातमी मिळाली आहे. अमेरिकेतील काही दिग्दर्शक माझे मित्र असल्यामुळे हे संभव होऊ शकले. त्यांनी मला बरीच मदत केली. मिळालेल्या माहितीनुसार, व्हाइट हाउसमध्ये चित्रीकरण करणरा अरबाज खान हा पहिलाच भारतीय अभिनेता असेल. येथे चित्रीकरण करण्यासाठी कडक सुरक्षेची व्यवस्था करण्यात येत आहे. ‘जीना इसी की नाम है’ हा एक कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट आहे. या चित्रपटात अरबाज अमेरिकेतील व्यावसायिकेच्या भूमिकेत दिसेल. अरबाजसह या चित्रपटात प्रेम चोप्रा, आशुतोष राणा, सुप्रिया पाठक आणि हिमांश कोहली यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित होईल.

दरम्यान, या आधी अरबाज ‘फ्रिकी अली’ या चित्रपटात झळकला होता. नवाजुद्दीनने यात मुख्य भूमिका साकारली होती. तर अरबाजने त्याच्या मित्राची भूमिका साकारली होती. सोहेल खान दिग्दर्शित ‘फ्रिकी अली’ चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली होती.