बॉलिवूडमध्ये गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या बायोपिकच्या ट्रेंडमध्ये अनेक नामवंत व्यक्तींच्या जीवनावर आधारित चित्रपटांची निर्मिती झाली. सुरुवातीला चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांच्या बायोपिकची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर हळूहळू हा प्रवास राजकीय क्षेत्राकडे वळला आहे. काही दिवसांपूर्वी ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’, ‘ठाकरे’ हे राजकीय व्यक्तीमत्वांवर आधारित चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांनंतर आता लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची निर्मिती करण्यात येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता बोमण इराणी यांची वर्णी लागली असून ते एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसून येणार आहे.

या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय पंतप्रधान मोदी यांच्या भूमिकेत दिसणार असून अन्य काही पात्रांविषयीचा देखील खुलासा झाला आहे. त्यातच आता बोमण इराणी या चित्रपटामध्ये एक प्रसिद्ध उद्योगपतीची भूमिका साकारणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

बोमण इराणी उद्योगपती रतन टाटा यांच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र चित्रपटाच्या टीमकडून याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दरम्यान, दिग्दर्शक ओमंग कुमार हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून सुरेश ओबेरॉय आणि संदिप सिंग हे निर्मिती करत आहेत. या चित्रपटात चित्रिकरण गुजरातच्या विविध भागात झालं असून नरेंद्र मोदी यांच्या राजकिय जीवनातील महत्त्वाच्या घडामोडींवर प्रकाश टाकण्यात येणार आहे.