बॉलिवूड अभिनेता इरफान खानची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वीच इरफान कॅन्सरसारख्या आजारावर मात करत भारतात परत आला होता. सप्टेंबर २०१९ मध्ये इरफान भारतात परत आल्यानंतर त्याला सध्याच्या गंभीर परिस्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे सर्व चाहत्यांच्या चिंतेत भर पडली होती. मात्र इरफानची प्रकृती स्थिर असून colon infection मुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती परिवाराने दिली आहे.

सध्या डॉक्टर त्याच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत. आम्ही वेळोवेळी त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती देत राहू, आतापर्यंत त्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर तो एवढी मोठी लढाई जिंकत आला आहे. यापुढेही याच इच्छाशक्तीच्या जोरावर तो यावर मात करेल असं त्याच्या परिवाराने म्हटलं आहे.

इरफान खानने मार्च २०१८ मध्ये आपल्याला कॅन्सर झाला असल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर त्याने सर्व कामं थांबवली होती आणि उपचारासाठी लंडनला निगून गेला होता. २०१९ मध्ये परतल्यानंतर इरफानने ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. चित्रपटातील अभिनयासाठी इरफान खानचं कौतुक करण्यात आलं होतं. सोबतच पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्याबद्दल आनंदही व्यक्त केला होता. १३ मार्च २०२० रोजी अंग्रेजी मीडियम चित्रपट रिलीज होणार होता. मात्र लॉक़ाउनमुळे ६ एप्रिल रोजी डिजीटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करण्यात आला.