सध्या संपूर्ण देश करोनाविरुद्ध लढा देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. करोनावर मात करण्यासाठी देशात लॉकडाउनही घोषित करण्यात आला आहे. मात्र तरीदेखील करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. आतापर्यंत अनेकांना करोनाची लागण झाली असून यात काही सेलिब्रिटींचाही समावेश आहे. यातच ईआता अभिनेता किरण कुमार यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलत असताना त्यांनी स्वत: ही माहिती दिली.

किरण कुमार यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना घरात क्वारंटाइन करण्यात आलं आहे. “मी १४ मे रोजी करोनाची चाचणी केली होती. त्यानंतर आलेल्या रिपोर्टसमध्ये मला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. मात्र माझ्यात करोनाची कोणतीच लक्षणं दिसून आली नव्हती. ताप, सर्दी, खोकला किंवा श्वास घेण्यास कोणतीही समस्या मला जाणवत नव्हती. मी पूर्णपणे व्यवस्थित होतो. परंतु तरी मला करोना झाला आहे.त्यामुळे मी घरातच क्वारंटाइन झालो आहे. माझं घरं दुमजली असल्यामुळे मला घरात राहण्यास कोणतीच अडचण येत नाहीये”, असं किरण कुमार म्हणाले.

पुढे ते म्हणतात, “सध्या माझी प्रकृती ठीक आहे. माझी पत्नी आणि मुलं घराच्या पहिल्या माळ्यावर राहत आहेत, आणि मी टॉप फ्लोअरवर एकटा राहत आहे. मी आता २६ किंवा २७ तारखेला पुन्हा एकदा करोना चाचणी करणार आहे”.
दरम्यान, करोनाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. किरण कुमार यांच्यापूर्वी कलाविश्वातील काही सेलिब्रिटींनाही करोनाची लागण झाली होती. यात कनिका कपूर, चित्रपट निर्माते करीम मोरानी, त्यांच्या दोन्ही मुली, अभिनेता पूरब कोहली, फ्रेडी दारुवालाचे वडील,सत्यजीत दुबे यांची आई अशा काही सेलिब्रिटींना करोनाची लागण झाली होती.