मंगेश देसाई, अभिनेता

मनासारखी गोष्ट होत नसेल तर ताण नक्कीच येतो. मात्र त्या क्षणाला आपणच आपल्या मनाला समजावायला हवे की, ताण ही व्यापक संकल्पना आहे. कमी-अधिक प्रमाणात ताण येणारच, पण तो ताण आपण कसा हाताळतो, त्यावर सर्व काही अवलंबून असते. ताणाचे वाईट परिणाम लक्षात घेतल्यानंतर आपण आपोआप ताणमुक्त राहतो. मी तणावमुक्त राहण्यासाठी माझ्या कुटुंबासोबत सिनेमागृहात चित्रपट पाहायला जातो. चित्रपट पाहणे हा माझ्यासाठी ताणमुक्तीसाठीचा महत्त्वाचा मार्ग आहे. मी कोणत्याही भाषेतील चित्रपट पाहतो. मला चांगले चित्रपट पाहायला आवडते. चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या मनावरील ताण हलका होतो. मला भाषा समजत नाही, मात्र हावभावांवरून चित्रपटाचा आशय कळतो. त्यातील भूमिकांशी मी समरस होतो.

कधीतरी ताण आल्यावर मी मनसोक्त भटकतो. मी कॉफी शॉपमध्ये जातो. हॉटेलमध्ये जातो. मी माझी दुचाकी घेऊन दूरवर भटकंती करून येतो.

भटकण्याने माझा अर्धा अधिक ताण दूर होतो. मला कधी कोणी सांगितले की हे पुस्तक खूप चांगले आहे तर ते पुस्तक मी नक्की वाचतो. एखाद्याने सुचविलेले पुस्तक मी लवकर वाचून संपवतो. मी ताणमुक्त राहण्यात पुस्तकांचाही मोठा वाटा आहे. ताण दूर करण्यासाठी प्रामुख्याने आवडती गोष्ट करायला हवी. मी कधी कधी ताण आल्यास आवर्जून स्वयंपाकघरात जातो. मी त्या ठिकाणी मला आवडणारे पदार्थ बनवतो. ते पदार्थ बनविताना ताण दूर होण्यास चांगली मदत होते. मी ताण दूर करण्यासाठी वेब सीरिजही पाहतो. मी ‘गेम ऑफ थ्रोन्स’ पाहतो, मी नार्कोज, सॅक्रेड गेम्स या वेब सीरिजचा मोठा चाहता आहे. मी वर्षांतून दोनदा ट्रीपला जातो. वर्षभराचा ताण त्याने दूर होतो. हल्ली बरेच कलावंत तणावात असतात. त्यांनी ताण न घेता कामात रमायला हवे, असे माझे मत आहे. ताणमुक्त राहण्यासाठी आपल्या आयुष्यातील नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. अनेकदा तुम्हाला अनेक व्यक्ती टोमणे मारतील. टोचून बोलतील पण तुम्ही अनेकदा अशा गोष्टींचा विचार करत राहू नका. तुम्ही ताणमुक्त राहण्यासाठी स्वत:मध्ये रमा, स्वत:वर प्रेम करा.

आयुष्य हे खूप लहान आहे. या आयुष्यात जितके जगता येईल तितके जगून घ्यायला हवे. माणसाने नेहमी ताणमुक्त राहायला हवे. तो ताणमुक्त नसेल तर त्याचा गंभीर परिणाम हा त्याच्या सर्वागीण विकासावर होत असतो. मी माझ्या आयुष्याकडे एक वाहता झरा या दृष्टीने पाहतो. झरा हा जसा निखळ असतो त्याचप्रमाणे ताणमुक्त राहण्यासाठी मनही झऱ्यासारखे निखळ ठेवावे. परोपकारी राहण्यात आनंद शोधावा.

शब्दांकन- हृषीकेश मुळे