मंगेश कदम, अभिनेता

उत्कृष्ट दिग्दर्शकासोबतच दर्जेदार अभिनेते असलेले मंगेश कदम यांचा दिवसातील बराचसा वेळ वाचन, लेखन आणि घरातील काम करण्यात जातो. टाळेबंदीमुळे सध्या घरी असल्याने मी ‘नेटफ्लिक्स’, ‘अ‍ॅमेझॉन प्राइम’वर हिंदी, मराठी वेबमालिका पाहतो. यात निर्भया हत्याकांडावर आधारित ‘दिल्ली क्राइम’, नीरज पांडे दिग्दर्शित ‘स्पेशल ऑप्स’ या दोन वेबमालिकेचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. दर्जेदार मांडणी, उत्कृ ष्ट छायाचित्रण या वैशिष्टय़ामुळे या वेबमालिका प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे क्षेत्र विस्तारत असून विविध प्रकारच्या वेबमालिका येत आहेत. या वेबमालिका पाहिल्याने अभिनय, तांत्रिक बाबी पुन्हा नव्याने समजत असल्याचे मत मंगेश कदम यांनी व्यक्त केले.

मंगेश कदम आणि लीना भागवत ही जोडगोळी ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेच्या निमित्ताने छोटय़ा पडद्यावर एका मोठय़ा बदलाची नांदी असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीरंग गोडबोलेने मालिकेची संकल्पना समजावून सांगितली. यात वेशभूषा, रंगभूषा आणि तांत्रिक बाबी स्वत:च हाताळायच्या असल्याने अभिनयासोबत दिग्दर्शन कौशल्याचाही कस लागतो. मर्यादित साहित्यानिशी चित्रीकरण करणे खरेच आव्हानात्मक असल्याचे मत मंगेश कदम व्यक्त करतात. सध्या घरातच मालिका चित्रित करत असल्याने त्याचे सेटमध्ये रूपांतर केले आहे. सकाळी स्वयंपाक वगैरे करून मी आणि लीना चित्रीकरणाच्या तयारीला लागतो. मोबाइलवर चित्रीकरण करताना प्रकाशयोजना, आवश्यक साहित्य यांचे नियोजन करतो. दुपारी जेवण करून थोडीशी विश्रांती घेतल्यावर पुन्हा सायंकाळपर्यंत चित्रीकरण करतो. त्यानंतर मालिकेच्या टीमशी चर्चा करणे, पटकथेचे वाचन करणे ही कामे सुरू असतात. या मालिकेच्या निमित्ताने टाळेबंदीतही अभिनय करत आहे. परिणामी, गेले महिनाभर करोनाच्या बातम्या ऐकून निराश झालेले मन प्रफुल्लित झाल्याचे त्यांनी सांगितले.

याचबरोबर मन प्रसन्न राहण्यासाठी सकाळी उठल्यावर योगासने, प्राणायाम करतो. त्याला अनुरूप सुका मेवा, फळे, भाज्या, कडधान्ये असा सर्वसमावेशक पोषक आहार घेतो. यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यही राखले जात असल्याचे मत मंगेश कदम व्यक्त करतात. याव्यतिरिक्त उरलेल्या वेळात त्यांचे  वाचन सुरू आहे. ‘झिम्मा’ हे विजयाबाईंचे आत्मचरित्र, ‘गारंबीचा बापू’ ही पुस्तके पुन्हा वाचली. ‘प्यासा’, ‘कागज के फूल’ आणि ‘चौदहवी का चांद’ या चित्रपटांच्या निर्मितीची कथा सांगणारे गुरू दत्तचे अप्रतिम पुस्तक माझ्या वाचनात आले. गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, कमल देसाई, बाबूराव बागूल या लेखकांच्या कथा मी वाचल्या. तसेच काही लेखकांनी कथा पाठवल्या असून त्यावर काम सुरू आहे. हे सगळे सुरू असताना स्वयंपाक आणि घराची साफसफाई करत असल्याचेही ते आवर्जून सांगतात.

संकलन  – मानसी जोशी