गरोदर महिलेला प्रसुतीसाठी नेणं ही इमर्जन्सी नाही का असा सवाल करत बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरी याने मुंबई पोलिसांना टॅग केलं. रणवीरच्या घरी घरकाम करणाऱ्याच्या पत्नीला प्रसुतीसाठी रुग्णालयात घेऊन जायचं होतं. यासाठी रणवीरने त्याची गाडी दिली होती. मात्र रस्त्यावर एका पोलीस कर्मचाऱ्याने रणवीरची गाडी अडवली आणि कारण सांगूनही ड्राइव्हरसह गाडी ताब्यात घेतली. या प्रकरणानंतर रणवीरने मुंबई पोलिसांना टॅग करत काही ट्विट केले. ट्विटरच्या माध्यमातून रणवीरने मुंबई पोलिसांची मदत मागितली.

गरोदर महिलेची प्रसुती ही इमर्जन्सी नाही, असं तो पोलीस अधिकारी म्हणत आहे. आम्ही काय करावं, असा प्रश्न त्याने ट्विटरवर मुंबई पोलिसांना विचारला. त्यानंतर रणवीरला घराबाहेर पडून पोलीस ठाण्यात जावं लागलं. तब्बल आठ तासांनंतर रणवीरची गाडी त्याला परत देण्यात आली. ‘उशिरा का होईना, मदत केल्याबद्दल धन्यवाद. माझे आठ तास वाया गेले पण तुमच्यावरचा विश्वास नाही’, असं म्हणत त्याने पोलिसांचे आभार मानले.

आणखी वाचा : नोटाबंदीवर अनुराग कश्यपचा चित्रपट; अमृता सुभाष, उपेंद्र लिमये महत्त्वपूर्ण भूमिकेत 

लॉकडाउनमध्ये कारण नसतानाही घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. अशा वेळी अनेक गोष्टींची शहानिशा पोलीस करत आहेत. रणवीरने घरकाम करणाऱ्या व्यक्तीची मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर कारवाईत वेळ गेल्यामुळे त्याला मनस्ताप सहन करावा लागला.