सिद्धार्थ जाधव, अभिनेता

प्रेक्षकांचा लाडका सिद्धू म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्याच्या काळात काय करतो आहे, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. तर आपला लाडका सिद्धू सध्या मुलगी स्वरा आणि ईरा सोबत वेळ घालवतो आहे. सिद्धार्थ म्हणाला, करोनामुळे मिळालेल्या सुट्टीत आम्ही चौघे मिळून एकत्र लुडो, पत्ते असे  खेळ खेळतो. एरव्ही चित्रपट, कार्यक्रम अशा अनेक कारणांमुळे मला घरी वेळ देता येत नाही. करोनामुळे मिळालेल्या सुट्टीचा पुरेपूर उपयोग करत मी मुलींचा अभ्यासही घेतो, त्यांच्याबरोबर चित्रेही काढतो. अभ्यासाबरोबर मुलींना चांगले चित्रपटही दाखवतो आहे, आम्ही नुकतीच ‘अ‍ॅव्हेंजर’ ही चित्रपट मालिका पाहिली.

माझी बायको तृप्ती सुगरण आहे. चविष्ट जेवण बनवते. या सुट्टीत मी तिला भाज्या चिरणे, भांडी घासणे, साफसफाई करणे यांसारख्या कामात मदत करतो आहे. हे काम करताना मला तिच्याही कामांची जाणीव झाली. व्यग्र दिनक्रमामुळे मी घरी खूप कमी वेळ  असतो. मी नसताना घर सांभाळणे, मुलींच्या शाळा, त्यांचा अभ्यास, या गोष्टी करणे म्हणजे तारेवरची कसरतच आहे आणि ती ही जबाबदारी उत्कृष्टपणे निभावते. यानिमित्ताने घराघरातील  स्त्रिया संपूर्ण घर कशापद्धतीने सांभाळतात, त्याची जाणीव झाली. अशा सगळ्याच गृहस्वामिनींना माझा मानाचा मुजरा. असे म्हणत सिद्धार्थ गृहिणींविषयी कृतज्ञता व्यक्त करतो.

या महिन्यात माझ्या ‘इरादा पक्का’, ‘क्षणभर विश्रांती’, आणि ‘लालबाग परळ’ या तीन चित्रपटांना  दहा वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटाच्या निमित्ताने मी, अश्विनी, सोनाली, नीलेश आम्ही लाइव्ह जाऊन चित्रपटाच्या आठवणी जागवल्या. प्रेक्षकांशी गप्पा मारल्या. आता हे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असल्याने प्रेक्षक पुन्हा पाहू शकतात. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे मराठी कलाकारांना नवीन व्यासपीठ निर्माण झाले आहे. सध्या मी अनेक वेब सीरीज आणि चित्रपट पाहतो आहे. नुकत्याच पाहिलेल्या ‘असुर’ या वेब सीरिजमधील अमेय वाघचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे. वरुण सोबती आणि अर्शद वारसी यांच्या तोडीस तोड अभिनय त्याने के ला आहे. मात्र त्या तुलनेत  ‘एक थी बेगम’ ही वेब सीरिज फारशी आवडली नसल्याचे त्याने सांगितले.

नुकताच ‘टेडेएक्स टॉक’ कार्यक्रमात प्रेक्षकांसमोर मी माझ्या आयुष्यातील चांगले-वाईट प्रसंग सांगितले. टेडएक्स सारख्या जागतिक दर्जाच्या व्यासपीठावर वक्ते इंग्रजीमधून बोलतात. मात्र मी मराठीतून प्रेक्षकांशी संवाद साधला. आपल्या मातृभाषेतून व्यक्त होण्यास कमीपणा वाटण्याचे काही कारण नाही. उलट प्रेक्षकांपर्यंत आपले विचार प्रभावीपणे मांडता येत असल्याचे त्याचे स्पष्ट मत आहे. सध्या करोनापासून लढण्यासाठी कलाकार गाणी, लघुपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना घरी राहण्याचे आवाहन करत आहेत. याचाच एक छोटासा प्रयत्न म्हणून दिग्दर्शक समीर विद्वांस आणि हेमंत ढोमे यांनी ‘तू चाल पुढं’ हे गाणे तयार केले, असून यात मीही सहभागी झालो होतो. या माध्यमातून जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्या पोलीस, डॉक्टर, परिचारिकांचे मी आभार मानतो, हेही तो आवर्जून सांगतो.

शब्दांकन – मानसी जोशी