सुनील बर्वे अभिनेता

लहानपणी मला वाचनाची फारशी आवड नव्हती. त्यामुळे त्या वयात ठरवून आणि विशेष व वेगळे असे काही वाचन झाले नाही. अभ्यासाचीच पुस्तके जास्त वाचली. अर्थात त्या वयात सर्वसामान्य मुले जे वाचन करतात तशा प्रकारचे वाचन मी केले. बालवयात मी ‘कॉमिक्स’ वाचली. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत (कॉन्व्हेंटमध्ये) शिक्षण झाल्यामुळे मराठी वाचन तसे कमीच होते. पुढे व्यावसायिक नाटकांमधून काम करायला सुरुवात करायला लागलो तेव्हा थोडेफार वाचन सुरू झाले. अभिनेते व दिग्दर्शक विनय आपटे यांच्या सांगण्यावरून मी मराठी ललित साहित्य वाचायला सुरुवात केली. वाचायला आणि समजायला सोपे जाईल असेच माझे तेव्हा वाचन होते. पु. ल. देशपांडे, व. पु. काळे यांची पुस्तके त्या वेळी वाचली. पुढे ‘चारचौघी’ नाटकाच्या निमित्ताने चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी, वंदना गुप्ते, लता नार्वेकर यांच्या सहवासात आल्यानंतर काही पुस्तकांचे वाचन झाले.

खरं सांगायचे तर मी मुळात वाचनाचा भोक्ता किंवा पट्टीचा वाचक असा नाही. त्यामुळे जसे जमेल तसे वाचन करत गेलो. वाचनप्रेमी किंवा वाचनाची खूप आवड असलेले लोक कोणते नवे पुस्तक बाजारात आले किंवा अमुक लेखकाने काय लिहिले आहे यावर लक्ष ठेवून असतात. पुस्तकांचे जाणीवपूर्वक वाचन करतात. तसे माझ्या बाबतीत घडत नाही. सहकलाकार किंवा मित्र यांनी अमुक एक पुस्तक चांगले आहे, ते जरुर वाच असे सांगितले की मी ते पुस्तक वाचतो. ‘अमुक एक पुस्तक वाच’ असे मला कोणीतरी सांगायला लागते. त्यामुळे माझे वाचन हे ठरावीक विषयापुरते नाही तर कोणत्याही विषयांवरील आणि विविध साहित्य प्रकारांतील पुस्तके मी वाचतो. माझ्यापेक्षा माझ्या पत्नीला आणि दोन्ही मुलांना वाचनाची आवड आणि गोडी अधिक आहे.

नाटकात काम करायला लागल्यानंतर माझे वाचन अधिक झाले. विश्राम बेडेकर यांचे ‘एक झाड दोन पक्षी’, प्रभाकर पेंढारकर यांचे ‘रारंगढांग’, शिवाजी सावंत यांचे ‘मृत्युंजय’ तसेच मेघना पेठे, कमल देसाई आदींची पुस्तके वाचली. ही आणि अन्यही मराठी पुस्तके वाचण्यामुळे एक मात्र चांगले झाले ते म्हणजे माझे मराठी सुधारले. कारण माझे सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाल्याने मराठी वाचन तसे कमीच होते. ते वाढले. या सगळ्या वाचनातून खूप काही शिकायला मिळाले. प्रत्येक पुस्तकातून काही ना काही मिळत गेले. पुस्तकांच्या वाचनामुळे मराठी वृत्तपत्रे, वृत्तपत्रातील लेख, अग्रलेख नियमित वाचायला लागलो.

मराठी रंगभूमीवर ‘मैलाचा दगड’ ठरलेली आणि गाजलेली काही चांगली नाटके ‘हर्बेरियम’ या उपक्रमाच्या माध्यमातून मी पुन्हा नव्याने व नव्या संचात सादर केली. ‘हर्बेरियम’च्या निमित्ताने मधुसूदन कालेलकर, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर यांची नाटके तसेच ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेले ‘बिकट वाट वहिवाट’ या नाटकांचे वाचन झाले. आता लवकरच ‘हर्बेरियम’अंतर्गत काही जुनी नाटके सादर करणार आहे. त्यामुळे सध्या पुन्हा एकदा वेगवेगळ्या नाटकांचे वाचन मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. अगदी खूप मोठा नाही पण घरी माझा स्वत:चा पुस्तकसंग्रह आहे. ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांचे ‘झिम्मा’, मीना प्रभू यांची प्रवासवर्णनपर पुस्तके, नाटय़ व कला क्षेत्राशी संबंधित पुस्तके यांचा त्यात समावेश आहे.

आमच्याकडे माझ्या पत्नीने दोन्ही मुलांमध्ये लहानपणापासूनच वाचनाची गोडी निर्माण केली आहे. त्यामुळे मी माझ्या लहानपणी जेवढे वाचत नव्हतो त्यापेक्षा जास्त पुस्तकांचे वाचन माझी दोन्ही मुले करतात. हल्लीची पिढी अर्थात काही अपवाद वगळता सर्व वाचन भ्रमणध्वनीवर करत आहे. ई-बुक रीडर व अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर ही मुले किंवा तरुण पुस्तके, वृत्तपत्रांचे वाचन करतात. त्यामुळे नवीन पिढी हल्ली किती वाचत असेल, असा प्रश्न पडतो. ‘ऑडिओ बुक’ हा एक नवा पर्यायही हल्लीच्या नव्या पिढीपुढे आहे. अलीकडेच काही ‘ऑडिओ बुक’साठी मी आवाज दिला. त्यानिमित्ताने आपोआपच माझेही पुस्तकांचे वाचन झाले.  स्मार्ट भ्रमणध्वनी, संगणक, इंटरनेट, विविध ‘सामाजिक माध्यमे’ या सगळ्यांमुळे आत्ताच्या पिढीचे आणि विद्यार्थ्यांचे वाचन हळूहळू कमी होत चालले असावे, असा माझा अंदाज आहे. पालकांनी आपल्या मुलांची आवड लक्षात घेऊन त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करावी. मुलांना वाचनाची गोडी लावण्यात आई किंवा वडील यांचाही महत्त्वाचा सहभाग असला पाहिजे.