पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी (१४ फेब्रुवारी) झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात राखीव पोलीस दलाचे ४० पेक्षा अधिक जवान शहीद झाले. जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याने तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे पुलवामा जिल्ह्य़ात आत्मघातकी हल्ला घडविला. या भ्याड हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयांचा संताप अनावर झाला आहे. क्रीडा क्षेत्रापासून ते बॉलिवूडपर्यंत सर्वजण या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आहेत. दहशतवाद्याच्या या भ्याड हल्ल्याचा बॉलिवूड अभिनेता विकी कौशल यानेही निषेध केला असून त्याने या प्रकरणी त्याचं मत व्यक्त केलं आहे.

‘१४ फेब्रवारीला झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात आपण आपल्या बांधवांना गमावलं आहे. त्यांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी आता भरुन निघणं शक्य नाही. देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांच्या मृत्युनंतर माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तींना गमावल्याचं दु:ख मला जाणवतंय. आयुष्यात निर्माण झालेली ही पोकळी आता भरुन निघणं शक्य नाही. मात्र या शहीदांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी आपल्या सगळ्यांना एकत्र येण्याची गरज आहे. देशातील साऱ्या जनतेने आता एकत्र येऊन शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी काही तरी करायला हवं. त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करा’, असं विकीने म्हटलं.

पुढे तो असंही म्हणाला, ‘दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्लानंतर आता शांत बसण्यात अर्थ नाही. त्यांच्या या हल्ल्याला आपण जशास तसे उत्तर द्यायला हवे. त्यांना सडेतोड उत्तर देण्याची हीच खरी वेळ आहे’.

दरम्यान, विकी कौशलप्रमाणेच अनेक बॉलिवूड कलाकारांनी या हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांच मत व्यक्त केलं आहे. विकीचा ‘उरी : द सर्जिकल स्टाइक’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याला भारतीय जवानांचं आयुष्य जगण्याची संधी मिळाली. त्यामुळेच पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर तो प्रचंड भावूक झाल्याचं पाहायला मिळत आहे.