अभिनेता सुमित राघवन याने काही दिवसांपूर्वी ‘फेसबुक’वर डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाटय़गृहातील दुरवस्थेबाबतची एक ध्वनिचित्रफीत टाकली होती. नाटय़गृहातील अव्यवस्थेचे दर्शन त्यात घडले होते. ही अवस्था फक्त सावित्रीबाई फुले नाटय़गृहाची नाही, तर मुंबईसह महाराष्ट्रातील (काही मोजके अपवाद वगळता) सर्वच नाटय़गृहांची आहे. बाहेरून चकचकीत दिसणाऱ्या या नाटय़गृहांच्या इमारतीत स्वच्छतागृहांपासून ते कलाकारांशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टींमध्ये त्रुटी आहेत. त्यामुळे नाटय़गृहांची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे ही नाटय़गृहे चकचकीत दिसत असली तरी प्रेक्षक आणि कलाकारांसाठी ती तापदायक ठरली आहेत. त्याविषयी काही कलाकार, निर्माते व दिग्दर्शक यांच्याशी बोलून केलेला हा वृत्तान्त.

‘नाटक’ हे मराठी माणसाचे पहिले प्रेम/वेड आहे असे म्हटले जाते आणि ते खरेही आहे. कारण मराठी रंगभूमीवर दररोज आणि सातत्याने मराठी नाटकांचे प्रयोग सुरू असतात तेवढे अन्य भारतीय भाषांमध्ये नाटकांचे प्रयोग होत नाहीत (अपवाद हिंदी किंवा बंगाली रंगभूमीचा.) सध्याच्या काळात मराठी रंगभूमीपासून प्रेक्षक दुरावला असल्याची ओरड होत असली, ‘बुकिंग’ कमी झालेले असले तरी ज्या संख्येने नवीन मराठी नाटके रंगभूमीवर सादर होत आहेत किंवा प्रेक्षकांचा जो प्रतिसाद मिळत आहे ते पाहता मराठी रंगभूमी लोप पावेल अशी व्यक्त होणारी भीती योग्य नाही असेच म्हणावे लागेल.

नाटय़गृहात नाटक पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांना आणि नाटकातील सहभागी कलाकार, रंगभूमीच्या पाठीमागे काम करणारे कलाकार (बॅक स्टेज आर्टिस्ट), तंज्ञत्र यांच्यासाठी नाटय़गृहातील वातावरण हे सुखद असेल तर सगळ्यांसाठीच ते आनंददायी असेल. स्वच्छता आणि नाटकाशी संबंधित असलेल्या किमान काही गोष्टी या सुव्यवस्थित असणे हे अत्यंत गरजेचे आणि आवश्यक आहे. नाटय़गृहाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या किंवा ते नाटय़गृह ज्या संस्थेमार्फत चालवले जाते (नगरपालिका, महानगरपालिका किंवा खासगी संस्था) त्यांची ती जबाबदारी आहे. या विषयाकडे सर्वानीच अत्यंत गंभीरतेने पाहण्याची आवश्यकता आहे. प्रसारमाध्यमातून नाटय़गृहाच्या दुरवस्थेबद्दल बातम्या प्रसिद्ध झाल्या की तात्पुरती मलमपट्टी केली जाते. पण पुन्हा काही दिवसांनी ‘ये रे माझ्या मागल्या’ अशीच परिस्थिती होते.

ज्येष्ठ नाटय़ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी या विषयावर ‘रविवार वृत्तान्त’शी बोलताना म्हणाले, मुंबईसह राज्यभरातील नाटय़गृहात मूलभूत प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे हे प्रेक्षक आणि कलाकारांसाठी अत्यावश्यक आणि गरजेची बाब आहे. राज्यातील श्रीमंत म्हणवल्या जाणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांनी नाटय़गृहे बांधताना येथे नाटकांचे प्रयोग होणार आहेत, याचा विचारच केलेला आहे असे वाटत नाही.  राजकीय मेळावे आणि अन्य समारंभच येथे होतात किंवा होतील अशा दृष्टीनेच त्यांनी विचार केला असावा असे दिसते. नाटकासाठी प्राधान्य दिले गेले आहे असे दिसत नाही. नाटकासाठीची ध्वनी, प्रकाशयोजना, रंगभूमी व्यवस्था, रंगभूषा आणि वेषभूषा कक्ष, स्वच्छतागृह या बाबतीतील किमान प्राथमिक गरजा पूर्ण होण्याची अपेक्षा बाळगली तर ती काही चुकीची नाही. पण या अपेक्षाही पूर्ण होऊ शकत नाहीत. राज्यातील १५ ते २० टक्के नाटय़गृहातील पडदेही योग्य प्रकारे उघडले जात नाहीत अशी परिस्थिती आहे. नाटय़गृहे बाहेरून चकचकीत दिसतात, आतमध्ये म्युरल्स व आकर्षक सजावट केलेली असते, पुतळे उभारलेले असतात पण मूलभूत गरजांविषयी मात्र सगळी अनास्था असते. नाटय़गृहाच्या वास्तूवर कोटय़वधी रुपये खर्च केले जातात पण या काही प्राथमिक गरजांकडे लक्ष दिले जात नाही ही दुर्दैवाची बाब आहे. ‘पृथ्वी थिएटर्स’सारखे नाटय़गृह एका कलाकाराने उभे केले आहे. तिथे मराठी, हिंदी नाटकांचे प्रयोगही होत असतात. नाटकांच्या पुस्तकांचे दुकान, कॅफेटेरिया, कॅन्टीन अशा सुविधा तेथे आहेत. अशी नाटय़गृहे आपण का उभी करू शकत नाही. मुळात मराठी नाटकाला येणारा प्रेक्षकवर्ग हा चाळिशी-पन्नाशीच्या पुढचा आहे. चित्रपटांची ‘मल्टिप्लेक्स’ जशी चकचकीत असतात तशी सर्व सुविधांनी युक्त अशी नाटय़गृहे बांधली तर तरुण वर्गही मराठी नाटकांकडे वळायला मदत होईल. त्यातही नवीन नाटय़गृहे बांधताना ती दीड हजार क्षमतेची बांधूच नयेत. जेमतेम ८०० ते ९०० आसनक्षमतेची ती बांधली जावीत, असे वाटते. एखादे लघुनाटय़गृह, नाटकाच्या तालमीसाठीचे सभागृह तिथे असावे. नाटय़गृहाचे नूतीकरण करताना किंवा बांधताना नाटय़व्यवसायाशी संबंधितांच्या मतांचा विचार केला जावा. त्यांच्या मताला प्राधान्य दिले जावे, असेही कुलकर्णी यांनी स्पष्टपणे सांगितले.

अभिनेता आणि निर्माता अशा दोन्ही भूमिकांमध्ये वावरणाऱ्या प्रशांत दामले यांच्या मते, मुंबईसह राज्यातील बहुतांश नाटय़गृहातील स्वच्छतागृहे अत्यंत अस्वच्छ आणि खराब अवस्थेत आहेत. नाटय़गृह उभारताना किंवा त्याची दुरुस्ती व नूतनीकरण करताना कलाकार व नाटय़क्षेत्राशी संबंधितांशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात यावेत. नाटय़गृहातील सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, तिथल्या त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनाने एखादे राज्यस्तरीय मंडळ स्थापन करावे, त्यासाठी राज्य आणि केंद्राकडून आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यात यावा. अंदाजपत्रकात वेगळ्या निधीची खास तरतूद केली जावी. मुंबईसह राज्यातील सर्व नाटय़गृहे या मंडळाच्या एकाच छताखाली आणली जावीत. नाटक किंवा कला सादर करणारे जे जे कलावंत आहेत त्यातील निवडक कलाकार आणि नाटय़क्षेत्राशी संबंधित ज्या ज्या शाखा आहेत त्यातील तज्ज्ञ यांची एक समितीही स्थापन करून त्यांचा सल्ला वेळोवेळी घेतला जावा. त्या त्या नाटय़गृहांमध्ये साहाय्यक नाटय़ व्यवस्थापक म्हणून नाटय़क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीचीच नेमणूक केली जावी, अशी अपेक्षाही प्रशांत दामले यांनी व्यक्त केली.

अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनीही नाटय़गृहांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले. स्वच्छता हा प्रेक्षक-कलाकार आणि अन्य संबंधितांशी अत्यंत जिव्हाळ्याचा असा विषय आहे. नाटय़गृहाची दयनीय अवस्था पाहून तिथे प्रयोग करण्याची इच्छाच होत नाही. ते वातावरण मरगळ आणणारे असते. मात्र तशाही परिस्थितीत आम्ही कलाकार काम करतो आणि प्रेक्षकही त्या तशा वातावरणात नाटकाचा आनंद  घेतात. नाटय़गृहातील बेसीन किंवा कोपऱ्यात पान, गुटखा, तंबाखूच्या पिचकाऱ्या टाकलेल्या असतात. स्वच्छतागृहे नेहमीच अस्वच्छ असतात. महिला क लाकारांसाठी असलेल्या रंगभूषा व वेशभूषेच्या खोल्यांच्या कडय़ा नीट लावता येत नाहीत किंवा त्या तुटलेल्या असतात. खोल्यांना धड पडदेही नसतात. अशा परिस्थितीत काम करणे कलाकारांनाही अवघड जाते. पैसे खर्च करून येणाऱ्या प्रेक्षकांनाही या सगळ्याचा त्रास सहन करावा लागतो. औरंगाबाद येथील एका प्रयोगानंतर मी आजारी पडले होते. त्यामुळे औरंगाबाद येथे प्रयोग करणेच मी बंद केले आहे, असा अनुभवही मुक्ताने सांगितला. अन्न, वस्त्र आणि निवारा याप्रमाणेच ‘स्वच्छता’ ही मूलभूत गरज आहे. ते नाटय़गृह ज्यांच्यातर्फे चालविण्यात येते त्याच्या व्यवस्थापनाने स्वच्छता आणि या प्राथमिक सुविधा व गरजांकडे गंभीरपणे लक्ष दिले पाहिजे, असे आग्रही मत तिने व्यक्त केले.

नाटय़निर्माते अनंत पणशीकर यांनीही नाटय़गृहातील दुरवस्थेबाबत चिंता व्यक्त  केली. प्रेक्षक आणि कलाकार या दोघांनाही नाटय़गृहात येण्यासाठी सुखद आणि पोषक वातावरण असले  पाहिजे. स्वच्छता आणि कलाकारांसाठी आवश्यक असणाऱ्या किमान प्राथमिक सोयी-सुविधा तेथे चांगल्या अवस्थेत असाव्यात. काही ठिकाणी रंगभूमीच्या मागे वावरताना स्वच्छतागृहातील दरुगधीचा त्रास सहन करावा लागतो. हे सगळे बदलण्यासाठी नाटय़गृह स्वच्छतेची जबाबदारी एखाद्या बाहेरच्या संस्थेकडे द्यावी, असे वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.

चित्रपटांची ‘मल्टिप्लेक्स’ जशी चकचकीत असतात तशी सर्व सुविधांनी युक्त अशी नाटय़गृहे बांधली तर तरुण वर्गही मराठी नाटकांकडे वळायला मदत होईल. त्यातही नवीन नाटय़गृहे बांधताना ती दीड हजार क्षमतेची बांधूच नयेत. जेमतेम ८०० ते ९०० आसनक्षमतेची ती बांधली जावीत, असे वाटते. एखादे लघुनाटय़गृह, नाटकाच्या तालमीसाठीचे सभागृह तिथे असावे.

चंद्रकांत कुलकर्णी

मुंबईसह राज्यातील बहुतांश नाटय़गृहातील स्वच्छतागृहे अत्यंत अस्वच्छ आणि खराब अवस्थेत आहेत. नाटय़गृह उभारताना किंवा त्याची दुरुस्ती व नूतनीकरण करताना कलाकार व नाटय़क्षेत्राशी संबंधितांशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात यावेत. नाटय़गृहातील सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, तिथल्या त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनाने एखादे राज्यस्तरीय मंडळ स्थापन करावे,

प्रशांत दामले

नाटय़गृहाची दयनीय अवस्था पाहून तिथे प्रयोग करण्याची इच्छाच होत नाही. ते वातावरण मरगळ आणणारे असते. मात्र त्याही स्थितीत आम्ही काम करतो. स्वच्छतागृहे नेहमीच अस्वच्छ असतात. महिला क लाकारांसाठी असलेल्या रंगभूषा व वेशभूषेच्या खोल्यांच्या कडय़ा नीट लावता येत नाहीत. खोल्यांना धड पडदेही नसतात. अशा परिस्थितीत काम करणे कलाकारांनाही अवघड जाते.

मुक्ता बर्वे

प्रेक्षक आणि कलाकार या दोघांनाही नाटय़गृहात येण्यासाठी सुखद आणि पोषक वातावरण असले  पाहिजे.  किमान प्राथमिक सोयी-सुविधा तेथे चांगल्या अवस्थेत असाव्यात. काही ठिकाणी रंगभूमीच्या मागे वावरताना स्वच्छतागृहातील दरुगधीचा त्रास सहन करावा लागतो. हे सगळे बदलण्यासाठी नाटय़गृह स्वच्छतेची जबाबदारी एखाद्या बाहेरच्या संस्थेकडे द्यावी

अनंत पणशीकर