20 February 2019

News Flash

या अभिनेत्याच्या आईने रेखावर फेकली होती चप्पल

कमला यांना राग अनावर झाल्याने त्यांनी रेखांना शिवीगाळ केली

रेखा आणि विनोद मेहरा (सौजन्य - यूट्युब)

हिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या कलाकारांकडे पाहून अनेक होतकरु तरुण प्रेरणा घेतात. त्यांच्यासारखेच आपणही आयुष्यात काही तरी करावे अशी त्यांची इच्छा असते. बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी आपल्या चाहत्यांच्या मनावर यशस्वी छाप पाडली आहे. अनेक कलाकारांची सिनेकारकीर्द फार मोठी नसली तरी त्यांच्या चाहत्यांच्या संख्येत काही कमतरता नाही. याच कलाकारांमधील एक अभिनेता म्हणजे विनोद मेहरा.

१३ फेब्रुवारी १९४५ मध्ये अभिनेता विनोद मेहरा यांचा जन्म झाला. ‘रागनी’ या सिनेमाद्वारे बालकलाकार म्हणून विनोद मेहरा यांनी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले. या सिनेमात त्यांनी किशोर कुमार यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. १९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एक थी रिटा’ या सिनेमात विनोद यांनी मुख्य भूमिका साकारली होती. ‘ऐलान’, ‘घर’, ‘नागिन’, ‘अनुरोध’, ‘अमर दीप’ या विविध धाटणीच्या सिनेमांतून विनोद यांनी आपला असा एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता. सिनेसृष्टीत सुगीचे दिवस सुरु असतानाच विनोद मेहरा यांनी वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

रुपेरी पडद्यावर गाजलेल्या या अभिनेत्याचे खासगी आयुष्यही तितकेच वादग्रस्त घटनांनी ग्रासलेले होते. वैवाहिक आयुष्य आणि सिनेकारकिर्दीला लागलेल्या उतरत्या कळेमुळे कळत- नकळत त्यांच्या आयुष्यावरही त्या सर्व घटनांचा परिणाम झाला. ते पुन्हा एकदा चर्चेत आले ते म्हणजे अभिनेत्री रेखासोबतचे त्यांचे नाते सर्वांसमोर उघड झाल्यानंतर.

आपल्या अभिनयाने ८०-९० चे दशक गाजवणाऱ्या अभिनेत्री रेखा यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजही त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली जाते. पण रेखा आणि विवेक यांचे लग्नही त्यांच्या करिअरप्रमाणेच वादग्रस्त ठरले. यासिर उस्मान यांच्या ‘रेखाः द अनटोल्ड स्टोरी’ पुस्तकात रेखा आणि विनोद मेहरा यांच्या लग्नाचा एक किस्सा मांडण्यात आला. रेखा जेव्हा कलकत्ता येथे विनोद मेहरा यांच्याशी लग्न करून सासरी गेल्या तेव्हा रेखा यांच्या सासूने त्यांना मारण्यासाठी चप्पल हातात घेतली होती. इतकेच नाही तर त्यांना घराबाहेरही हकलवून लावले होते. रेखा यांच्या आयुष्यातील अनेक घटनांपैकी ही एक अशी घटना आहे जी रेखा अजूनही विसरलेल्या नाहीत.

कलकत्ता येथे लग्न केल्यानंतर रेखा आणि विनोद मेहरा मुंबईला आले. त्यानंतर ते थेट त्यांच्या घरी पोहचले. मेहरा रेसिडेंस येथे पोहचताच रेखा त्यांच्या सासूचा म्हणजेच कमला मेहरा यांचा आशिर्वाद घेण्यासाठी गेल्या. त्या पाया पडण्यासाठी वाकताच कमला यांना त्यांना हटकले. तसेच, त्यांना घरात प्रवेश देण्यासही नकार दिला. कमला यांना राग अनावर झाल्याने त्यांनी रेखांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा विनोद यांनी आपल्या आईला समजवण्याचा बराच प्रयत्न केला. पण त्यांनी काहीच ऐकले नाही. उलट त्यांनी पायातली चप्पल काढून रेखा यांना जवळपास मारण्याचाच प्रयत्न केला. आपल्या सासूच्या अशा वागण्याने रेखा अचंबित झाल्या होत्या. आजूबाजूची सर्व मंडळी जमली होती. रेखा यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्या तेथून नंतर निघून गेल्या. पण विनोद मात्र तिथेच आपल्या आईला समजवत राहिले. रेखासोबत विनोद मेहराचे हे तिसरे लग्न होते. पण, त्यांचे नाते जास्त दिवस टिकले नाही. या घटनेने रेखा यांच्या आयुष्याला मोठी कलाटणी आली होती.

First Published on February 13, 2018 5:32 pm

Web Title: actor vinod mehra birthday marriage with rekha mother beating chappals