सांगली आणि कोल्हापूर भागातील भीषण पूरस्थितीनंतर या भागात मदतीचा ओघ वाढला आहे. अनेक स्तरांमधून येथील नागरिकांसाठी मदतीचे हात पुढे येत आहेत. यामध्ये प्रशासनापासून ते कलाविश्वापर्यंत अनेकांनी मदत केली आहे. त्यातच आता अभिनेत्री दिपाली सय्यदनेदेखील सांगलीतील १ हजार मुलींच्या लग्नाची जबाबदारी उचलली आहे. त्यासोबतच पूरग्रस्तांसाठी सय्यद फाऊंडेशनच्या माध्यमातून ५ कोटी रुपयांची मदतही जाहीर केली आहे.

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली, कोल्हापूर, सातारा आणि कोकण येथे पूरस्थिती निर्माण झाली. यामध्ये अनेकांचे संसार उद्धवस्त झाले तर अनेकांनी आपली जीवाभावाची माणसं गमावली. त्यामुळेच या पूरग्रस्त भागातील ज्या मुली विवाहयोग्य आहेत, मात्र ज्यांचे घरदार पूरामुळे उद्धवस्त झाले आहेत, अशा १ हजार मुलींच्या लग्नाची जबाबदारी दिपाली यांनी घेतली आहे.

या पूरामध्ये अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. त्यासोबतच असे अनेक कुटुंब आहेत जेथे विवाहयोग्य मुली आहेत. मात्र सध्या येथील परिस्थिती पाहता नागरिकांसमोर मुलींच्या लग्नाची आणि शिक्षणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळेच ज्या कुटुंबाचे घरदार, सारंच उद्धवस्त झालं आहे. त्या कुटुंबातील प्रत्येक मुलीच्या नावाने ५० हजार रूपयांची मुदत ठेव पावती करण्यात येणार आहे. ही रक्कम त्या मुलीच्या लग्नासाठी वापरण्यात येणार आहे. यात एकूण ५ कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती दिपाली सय्यद यांनी दिली आहे.

दरम्यान, काही दिवसापूर्वी दिपाली यांनी पूरग्रस्त भागाची पहाणी केली. यावेळी तिने या १ हजार मुलींच्या लग्नाची जबाबदारी उचलत पूरग्रस्तांसाठी ५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. त्यासोबतच सांगलीकरांना अनेकांनी मदत केली आहे, परंतु ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये, असं त्यांनी सांगितलं.