वायआरएफ स्टुडिओमधील स्वयंपाकघरही पुन्हा सुरू झाले आहे. यातून गोरेगावमधील हजारो आघाडीवरील कर्मचाऱ्यांना अन्न पुरवले जाणार आहे. तसेच, अंधेरीतील क्वारंटाइन सेंटर्समधील रुग्णांसाठी अन्न दिले जाणार आहे.

यश राज फिल्म्स या भारतातील सर्वात मोठ्या निर्मिती संस्थेने 2020 मध्ये सिनेसृष्टीतील दैदिप्यमान 50 वर्षे पूर्ण केली. आदित्य चोप्रा यांनी या महत्त्वाच्या टप्प्याबद्दल जगभरात वेगवेळ्या पद्धतीने सोहळे साजरे करण्यासाठी भव्य आखणी केली होती. सगळीकडे चर्चेचा विषय ठरलेल्या या सोहळ्यांसाठी फार मोठा निधीही मंजूर करण्यात आला होता. मात्र, देशात कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेचा प्रसार आणि सिनेसृष्टीतील काम पुन्हा बंद झाले असताना आदित्य चोप्रा यांनी वायआरएफ 50 चा सर्व निधी या क्षेत्राच्या आणि येथील रोजंदारी कामगारांच्या साह्यासाठी देऊ केला आहे.

वायआरएफतर्फे नवा उपक्रम सुरू केला जात आहे. या माध्यमातून गोरेगाव येथील हजारो आघाडीवरील कर्मचाऱ्यांना तसेच अंधेरीतील क्वारंटाइन सेंटर्समधील रुग्णांना वायआरएफ स्टुडिओच्या स्वयंपाकघरातून शिजवलेले अन्न पुरवले जाणार आहे. हिंदी सिनेसृष्टीसाठी या निर्मिती संस्थेने अनेक प्रयत्न केले आहेत. मागील आठवड्यात आदित्य यांनी यश चोप्रा साथी उपक्रम सुरू केला. यात सिनेसृष्टीतील हजारो कामगारांना आर्थिक मदत दिली जाणार आहे.

या उपक्रमाचा भाग म्हणून यश राज फाऊंडेशन या क्षेत्रातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना 5000 रु. थेट देऊ करणार आहे. तसेच, युथ फीड इंडिया या त्यांच्या एनजीओ भागीदारांच्या माध्यमातून चार व्यक्तींच्या कुटुंबांना महिन्याकाठी रेशन दिले जाणार आहे.

याआधीही वायआरएफने सिनेसृष्टीतील नोंदणीकृत कामगारांसाठी 30000 लशी विकत घेता येतील का अशी विचारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे केली होती. लस घेणाऱ्या कामगारांचा हा खर्च वायआरएफ करेल, अशीही घोषणा त्यांनी केली आहे.

ज्येष्ठ ट्रेड सोर्सने दिलेल्या माहितीनुसार, “काही काळाने परिस्थिती पूर्ववत झाली तरी वायआरएफ आता 50 वर्षांचा सोहळा साजरा करणार नाही. कारण हा सगळा निधी कोविड साह्यासाठी देण्याचा निर्णय आदित्य चोप्रा यांनी घेतला आहे. हा निधी तातडीने या क्षेत्राला पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी वापरायला हवा कारण या क्षेत्राला या संकटाचा फार मोठा फटका बसला आहे, या बाबतीत ते स्पष्ट आहेत. या सोहळ्यासाठी जगभरात होणाऱ्या कार्यक्रमांचा सुस्वरूप आराखडा तयार होता. जगभरात या कार्यक्रमांची चर्चा झाली असतील. पण, आता हे सगळं रद्द झालं आहे. आदित्य चोप्रा यांना फक्त क्षेत्राला मदत करण्यावर भर द्यायचा आहे. मागील 50 वर्षांपासून वायआरएफची सपोर्ट सिस्टम असलेल्या सर्वांना त्यांना मदत करायची आहे.”