गायक-संगीतकार अदनान सामीवर मुंबईत फ्लॅट आणि पार्किंगची जागा खरेदी केल्याप्रकरणी सरकारने ५० लाख रुपयांचा दंड ठेठावला आहे. भारतीय नागरिकत्व मिळालेले नसताना अदनान सामीने ही मालमत्ता खरेदी केली होती. यापूर्वी ईडीने अदनान सामीची संपूर्ण मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. मात्र, १२ सप्टेंबर रोजी ईडीने दिलेले आदेश ट्रिब्युनल कोर्टाने फेटाळले आणि अदनान सामीवर ५० लाख रुपयांचा दंड आकारण्यात यावा असे आदेश दिले आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?
अदनान सामीने २००३ मध्ये मुंबईमध्ये ८ फ्लॅट आणि ५ पार्किंग जागांची खरेदी केली होती. त्यावेळी अदनान सामीकडे भारताचे नागरिकत्व नव्हते. अदनाने ही प्रॉपर्टी खरेदी केल्याची माहिती आरबीआयला दिली नव्हती आणि हे भारतीय कायद्याचा भंग करणारे कृत्य आहे.

भारतीय कायद्यानुसार विदेशी नागरिकाने भारतातील कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीबाबत आणि खरेदी केलेल्या प्रॉपर्टीबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाला माहिती देणे गरजेचे होते. अदनान सामीने त्याच्या प्रॉपर्टीबाबत कोणतीही माहिती रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाला दिली नसल्याने या कायद्याचे उल्लंघन केले होते.

२०१० साली ईडीला याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर ईडीने अदनान सामीची संपूर्ण प्रॉपर्टी जप्त करुन २० लाख रुपयांचा दंड आकारण्यात यावे असे आदेश दिले होते. या विरोधात अदनानने अपिलेट ट्रिब्युनलमध्ये दाद मागितली. १२ सप्टेंबर रोजी ट्रिब्युनल कोर्टाने यावर निकाल दिला.

‘या प्रॉपर्टी खरेदी प्रकरणात विदेशी चलनाचा समावेश नाही. प्रॉपर्टीची संपूर्ण रक्कम ही भारतीय चलनात भरण्यात आली आहे. तसेच प्रॉपर्टी खदेरी करण्यासाठी घेण्यात आलेले कर्ज आणि आकारण्यात आलेला कर भारतीय रुपयांमध्ये भरण्यात आला आहे. त्यामुळे ईडीने प्रॉपर्टी जप्त करण्याचा दिलेला आदेश कोर्टाने फेटाळला. मात्र दंडाची रक्कम वाढवून ५० लाख रुपये करण्यात आली आहे. हा दंड भरण्यासाठी अदनान सामीला ३ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे’ असे ट्रिब्यूलने म्हटले आहे.

ट्रिब्यूनलचा निर्णय ऐकून अदनान सामीला आनंद झाला आहे. ‘मी माझ्या मेहनतीच्या कमाईने घेतलेली प्रॉपर्टी वाचली ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे’ असे अदानान म्हणाला.

मूळचा लाहोरचा असणारा अदनान सामी १३ मार्च २००१ रोजी पहिल्यांदा पर्यटक व्हिसावर भारतात आला होता. एका वर्षाच्या व्हीसासह भारतात आलेल्या अदनाने वेळोवेळी व्हीसाचे नूतनीकरण केले होते. मात्र त्याच्या पासपोर्टची मुदत संपल्यानंतर पाकिस्तानी अधिका-यांनी त्याच्या नूतनीकरणास नकार दिला. अखेर २०१६ मध्ये अदनान सामीला भारतीय नागरिकत्व देण्यात आले.