काडीमोड घेतलेली पत्नी सबा गलादरी हिला पोटगी म्हणून सहा कोटी ४० लाख रुपये आणि लोखंडवाला येथील आलिशान डय़ुप्लेक्स फ्लॅट देण्याचे आदेश कुटुंब न्यायालयाने पाकिस्तानी गायक अदनान सामी याला दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन न्यायालयाने गुरुवारी कुटुंब न्यायालयाच्या या आदेशाला स्थगिती देत सामीला दिलासा दिला. १० जूनपर्यंत ही स्थगिती कायम ठेवण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
सामीने कुटुंब न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील केले आहे. कुटुंब न्यायालयाचा निर्णय बेकायदा असल्याचा दावा सामीने या अपिलात करीत तो रद्द करण्याची मागणी केली आहे. न्यायमूर्ती रमेश धानुका आणि न्यायमूर्ती अनिल मेनन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर त्याच्या अपिलावर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने कुटुंब न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देत त्याला अंतरिम दिलासा दिला.
सामीने २००१ मध्ये सबाशी विवाह केला होता. मात्र २००४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तीन वर्षांनी ते दोघे पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी विवाह केला. परंतु २०१२ मध्ये दोघांनी पुन्हा एकदा संमतीने घटस्फोट घेतला. सामीकडून भरपाई मिळावी म्हणून सबाने अर्ज केला होता. गेल्या काही महिन्यांपासून त्यावर वाद सुरू आहे.
गेल्या एप्रिलमध्ये कुटुंब न्यायालयाने तिच्या अर्जावर निर्णय देताना पोटगी म्हणून सहा कोटी ४० लाख रुपयांसह लोखंडवाडा येथील आलिशान डय़ुप्लेक्स फ्लॅट देण्याचे आदेश न्यायालयाने सामीला दिले होते. एवढेच नव्हे, तर शारीरिक छळ केल्याप्रकरणी एक कोटीची भरपाई, मेहेर म्हणून १० लाख रुपये देण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.