काही दिवसांपूर्वीच ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला होता. टिझर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच चित्रपट वर्तुळात आणि सिनेरसिकांमध्ये या चित्रपटाविषयीच्या चर्चांना उधाण आले. करण जोहरच्या दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटाचा टिझर एका गाण्याच्या रुपात प्रदर्शित झाला होता. ‘तु सफर मेरा…’ असे म्हणत एका गाण्याने या टिझरची सुरुवात होते. या गाण्याचा व्हिडिओही आता प्रदर्शित झाल्याची माहिती करण जोहरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे.
फक्त एका टिझरच्या रुपात अनेकांच्या पसंतीस उतरलेल्या या गाण्याचा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. जीवनातील विविध प्रसंगांना उलगडू पाहणारे हे गाणे सध्या रसिकांची आणि कानसेनांची दाद मिळवत आहे. अमिताभ भट्टाचार्या यांनी लिहिलेल्या या गाण्याला तरुणाईचा आवडता गायक अरिजित सिंग याने गायले आहे. संगीतकार प्रीतम याने या गाण्याला संगीत दिले आहे.
‘रोमॅन्टिक ड्रामा’ प्रकारात येणाऱ्या या चित्रपटामध्ये अभिनेता रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, फवाद खान, अनुष्का शर्मा अशी तगडी स्टारकास्ट पाहता येणार आहे. एका गाण्याचा रुपात असणाऱ्या या टिझरमध्ये अभिनेता रणबीर कपूर गाणे गाताना दिसत आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय बच्चन आणि फवाद खान यांची झलकही टिझरमध्ये पाहायला मिळत आहे. एकतर्फी प्रेम, घनिष्ठ मैत्री आणि त्यातून होणारा हिरमोड असे हटके कथानक हाताळत हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता रणबीर कपूर आणि फवाद खान नव्या लूकमध्ये दिसणार आहेत. सध्या या दोन्ही अभिनेत्यांची त्यांच्या लूकसाठी चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने एका वेगळ्याच भूमिकेत दिसणारी ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर यांच्यातील केमिस्ट्री रसिकांना पाहायला मिळणार आहे. यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये रसिकांसाठी करण जोहर त्याच्या तगड्या स्टारकास्टसह ‘ए दिल है मुश्किल’ हा चित्रपट रसिकांच्या भेटीला आणणार आहे.

https://twitter.com/karanjohar/status/773113883661860864

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.