मी मद्रास कॅफे चित्रपट केला त्यावेळी काँग्रेससाठी चित्रपट केला, अशी टीका केली गेली. आता परमाणूनंतर मी भाजपासाठी चित्रपट केला असं म्हणाल का?, असा सवाल अभिनेता जॉन अब्राहमने टीकाकारांना विचारला आहे. कलाकारांनी ठाम भूमिका घ्यायलाच हवी, असेही त्याने म्हटले आहे.

जॉन अब्राहम १९९८ च्या अणुचाचणीवर आधारित ‘परमाणू’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जॉन अब्राहम या चित्रपटाचा निर्माता देखील असून तो नुकताच ‘द प्रिंट’च्या चर्चासत्रात सहभागी झाला होता. यात त्याने चित्रपट निर्मिती, अभिनय आणि कलाकारांची भूमिका याबाबत भाष्य केले. मला राजकीय समज आहे. परंतु मी अराजकीय व्यक्ती आहे. मद्रास कॅफेच्या वेळी काँग्रेससाठी चित्रपट केल्याचा आरोप केला गेला. मग आता परमाणूनंतर भाजपासाठी चित्रपट केला असं म्हणाल का, असा सवालच त्याने विचारला.

चित्रपट निर्मितीबाबत तो म्हणाला, निर्माता म्हणून मला बिग बजेट चित्रपटांच्या मागे धावायला आवडत नाही. मला पाच गाणी आणि त्यात नाचणारा अभिनेता दाखवायचा नाही. तुम्ही एक दर्जेदार चित्रपट तयार करा, प्रेक्षक नक्की बघायला येतील, असे त्याने सांगितले. प्रादेशिक भाषांमध्ये मराठी आणि मल्याळम या दोन भाषांमध्ये चांगले चित्रपट तयार होतात, असे त्याने आवर्जून सांगितले.

देशातील सद्य परिस्थितीबाबत सेलिब्रिटींच्या मौनावरुन टीका होत आहे. याबाबत विचारले असता जॉन अब्राहम म्हणाला, असुरक्षिततेमुळे हल्ली कलाकार बोलत नाही. पण सेलिब्रिटींनी ठाम भूमिका घ्यायलाच हवी, असे त्याने नमूद केले.