मराठी रंगभूमीवर सध्या पुनरुज्जीवित नाटकांची रांगच्या रांग लागली आहे. या रांगेतच आणखी एक नाटक समाविष्ट होत आहे. वेश्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे आणि एका विदारक जीवनाचे वास्तव मांडणारे नव्वदीतील ‘गोलपिठा’ पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. सुरेश चिखले लिखित हे नाटक २० वर्षांपूर्वी मिलिंद पेडणेकर यांनी दिग्दर्शित केले होते. पेडणेकरच हे नाटक पुन्हा घेऊन येत आहेत. रविवार, २ जून रोजी या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पुण्यात बालगंधर्व नाटय़गृहात होणार आहे.
गेल्या वीस वर्षांमध्ये सभोवताल बदलला असला, तरी अलेक्झांड्रा चित्रपटगृहाजवळचा गोलपिठा मात्र तस्साच आहे. तेथे बोलली जाणारी भाषा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जशीच्या तशी पुढे सरकली आहे. फक्त त्या वेळी पन्नास रुपयांमध्ये धंदा करायला तयार होणारी वेश्या आता ६० रुपये घेते. म्हणजे गेल्या वीस वर्षांत त्यांच्यासाठी काळ केवळ दहा रुपयांनीच पुढे सरकला आहे, असे लेखक सुरेश चिखले यांनी सांगितले.
नाटकाच्या नेपथ्यापासून दिग्दर्शनाच्या जागांपर्यंत सर्व नाटक वीस वर्षांपूर्वी बसवले होते, तसेच आहे. या मोहल्ल्यात वाजणारी गाणी तेवढी बदलली आहेत. मात्र तो काळ जपण्यासाठी आम्ही त्या वेळचीच गाणी कायम ठेवली आहे, असे दिग्दर्शक मिलिंद पेडणेकर यांनी सांगितले. या नाटकात आम्ही एक नवे गाणे टाकले आहे. या गाण्याला अशोक पत्की यांनी संगीत दिले आहे. इंग्रजांनी या वेश्यांच्या घरांना दिलेले क्रमांकही अजून तेच आहेत. ती घरेही तशीच आहेत. त्यामुळे नाटकाच्या मांडणीत बदल करणे आपल्याला पटले नाही, असे ते म्हणाले.
या नाटकात सुरेखा कुडची, हेमंत भालेकर यांच्यासह प्रियांका वामन, नेत्रा अकुला, काव्या माने, श्वेता म्हात्रे, विशाखा दरेकर, अनघा देशपांडे, अजित सावंत, अमेय बोरकर, दुर्गेश आफेरकर, दिवाकर मोहिते आदी कलाकार काम करत आहेत.