प्रतिनिधी

करोना संकटाच्या काळात आज गणपत्ती बाप्पांचं आगमन झालं आहे. त्यामुळे सर्वत्र चैतन्याचं आणि सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. म्हणूनच या काळातही प्रत्येक गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर आनंदाचं दिसून येत आहे. परंतु, यंदा सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाने हा दिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यावर भर दिला आहे. यामध्येच अग्गंबाई सासूबाई या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता आशुतोष पत्कीने गणेशोत्सवातील काही खास आठवणी सांगितल्या आहेत.

“मी देव मानतो. कधी वेळ मिळेल तेव्हा सिद्धिविनायक मंदिरात जातो. पण कोणत्यातरी विशिष्ट मंदिरात गेल्यानेच देव पावेल असं काही मी मानत नाही. त्यामुळे सिद्धिविनायक मंदिरात जाणं शक्य झालं नाही, तर शिवाजी पार्क जवळ एक गणेश मंदिर आहे, तिथे जातो. माझ्या काकांच्या घरी गणेशोत्सव साजरा होतो. माझ्या घरी गणपती बसवला जात नाही. पण मला लहानपणापासूनच गणेशोत्सवाचं प्रचंड आकर्षण आहे. त्यामुळे आमच्या घरी गणपती बसवण्यासाठी मी आईकडे हट्ट धरायचो. मला नातेवाईकांबरोबर वेळ घालवायला आवडतं. त्यामुळे आम्ही गणेशोत्सवासाठी काकांच्या घरी जातो. आई, बाबा, मी आणि माझे काही मित्र असे आम्ही सर्वजण रोज वेगवेगळ्या नातेवाईकांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला जातो. रोज काही घरं ठरवलेली असतात. मी जेथे शिकलो त्या रुपारेल महाविद्यालयातही गणेशोत्सव साजरा केला जातो. तो मला माझ्या घरचाच गणेशोत्सव असल्यासारखं वाटायचं”,असं आशुतोष म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “अग्गंबाई सासूबाई मालिकेचं गणेशोत्सव काळातल्या भागांचं चित्रीकरण झालं आहे. त्यामुळे आमच्या सेटवर उत्सव साजरा होणार नाही. गणेशोत्सव सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. सध्या आपल्याला वाईट बातम्या खूप ऐकू येत आहेत. अशा तणावग्रस्त परिस्थितीत सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या गणेशोत्सवाची गरज आहे. गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये आईच्या हातचे चविष्ट पदार्थ खाणं, पारंपरिक कपडे घालणं मला आवडतं. प्रसन्न वाटतं. यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी चांगले निर्णय घेतले आहेत. माझा उत्सव मोठा की तुझा उत्सव मोठा, ही स्पर्धा योग्य नाही. सण आपण आपल्या आनंदासाठी साजरा करतो. त्यामुळे लोकांना त्याचा त्रास होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. गणेशोत्सव पर्यावरणस्नेही पद्धतीने साजरा के ला पाहिजे. प्लास्टिकचा वापर टाळून आपण फुलांची सजावट करू शकतो. सुट्टीत माझा एखादा मित्र घरी येतो आणि काही दिवसांनी त्याची शाळा सुरू होणार म्हणून तो त्याच्या घरी परत जातो, त्या वेळी मनात असते तशी भावना गणपती विसर्जनाच्या दिवशी असते. आपल्या जवळचं कोणीतरी निघून जातंय असं वाटत राहतं.

सौजन्य : लोकप्रभा