अभिनेता अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा ऐतिहासिकपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. या चित्रपटाच्या निमित्ताने अजय पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आला आहे. प्रेक्षक-समीक्षकांकडून चित्रपटाची वाहवा होतेय. तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारण्यासाठी अजयने बरीच मेहनत घेतली. ‘लोकप्रभा’ला दिलेल्या मुलाखतीत अजयला त्याच्यात आणि तान्हाजी मालुसरे यांच्या काही साम्य आहे का असा प्रश्न विचारण्यात आला असता मी एक सामान्य माणूस आहे आणि तान्हाजी एक शूर-साहसी सेनापती आहेत असं उत्तर त्याने दिलं.
याविषयी बोलताना अजय देवगण म्हणाला, “माझ्यात आणि तान्हाजी मालुसरेंमध्ये कुठलेही साम्य नाही. कसं असेल? मी सामान्य माणूस तर तान्हाजी एक शूर-साहसी सेनापती. तान्हाजीमध्ये जे प्रखर राष्ट्रप्रेम -निष्ठा -समर्पण होतं ते हल्ली बघायला मिळत नाही. ‘तान्हाजी’ चित्रपटाची निर्मिती याचसाठी केली की जेणेकरून नव्या पिढीला तान्हाजी या असामान्य योद्धय़ापासून प्रेरणा मिळावी.”
आणखी वाचा : बॉक्स ऑफिसवरही ‘तान्हाजी’च हीरो
‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाने तीन दिवसांत ६० कोटीहून अधिक रुपयांचा गल्ला जमवला आहे. ओम राऊत यांना हिंदीच्या पदार्पणातच चांगले यश मिळाले आहे.