सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा, अबिगल पांडे यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावं समोर आली आहेत. दरम्यान या प्रकरणावर भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह हिने प्रतिक्रिया दिली. बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज घेतले जातात. जर एखाद्या कलाकाराने त्यांच्या विरोधात भूमिका घेतली, तर त्याच्यावर ही इंडस्ट्री बहिष्कार टाकते, असा खळबळजनक आरोप अक्षराने केला आहे.

अवश्य पाहा – “तिच्या सुंदर त्वचेचं रहस्य ड्रग्जमध्ये”; अभिनेत्याने उडवली दीपिकाची खिल्ली

आज तकला दिलेल्या मुलाखतीत अक्षराने बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणावर भाष्य केलं. “ड्रग्ज घेणाऱ्या कलाकारांना सिनेसृष्टीतील हायप्रोफाइल लोक असं मानलं जातं. त्यामुळे अनेक तरुण कलाकार या हायप्रोफाइल टॅगसाठी ड्रग्जचं सेवन करतात. खर तर हा प्रकार देशात सर्वत्र चालतो. परंतु मुंबईत याचं प्रमाण अधिक आहे. बॉलिवूडमध्ये कोण ड्रग्ज घेतं हे सर्वांना माहित आहे. परंतु कोणीही याबाबत बोलणार नाही. कारण इथे दोनच पर्याय असतात, एक तर मुग गिळून गप्प राहा, किंवा त्यांच्यासोबत ड्रग्ज घ्या. कारण या लोकांच्या विरोधात जाणाऱ्या कलाकारांना अप्रत्यक्षरित्या इंडस्ट्रीमधून बाहेर काढलं जातं. त्यामुळेच हे लोक आता एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करतायेत.” असा धक्कादायक खुलासा अक्षरा सिंग हिने केला आहे.

अवश्य पाहा – पतीला घटस्फोट देऊन ही अभिनेत्री राहतेय बॉबी देओलच्या घरात

अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंह यांना समन्स जरी करून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली. या वृत्ताला एनसीबीचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांनी दुजोरा दिला. दीपिकाला २५, तर श्रद्धा आणि सारा यांना २६ सप्टेंबरला हजर राहण्याबाबत कळविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूशी अंमली पदार्थाचा संबंध आहे का? या मुद्दय़ासोबत हिंदी चित्रपटसृष्टी (बॉलीवूड) आणि अंमली पदार्थ या समीकरणाबाबतही तपास सुरू आहे.