बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण आणि खिलाडी अक्षय कुमार पुढच्या वर्षीच्या दिवाळीत एकमेकांना  टक्कर देणार आहेत. अजय देवगणचा ‘गोलमाल ४’ आणि सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमारचा बहुचर्चित चित्रपट ‘२.ओ’ एकाच वेळी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहेत. ‘२.ओ’ हा चित्रपट रजनिकांतच्या ‘रोबोट’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. रजनीकांतच्या या चित्रपटाची जोरदार चर्चा असून हा चित्रपट अजय देवगणला चांगली टक्कर देऊ शकतो, अशी बॉलीवूडमध्ये चर्चा आहे.  ‘गोलमाल ४’ हा चित्रपट दिवाळीमध्ये प्रदर्शित करण्याची घोषणा यापूर्वी दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी केली होती. त्यानंतर आता रजनीकांत आणि अक्षय कुमारच्या बहुचर्चित चित्रपटाचा मुहूर्त देखील दिवाळीच्या मुहूर्तावर पक्का करण्यात आला आहे.

पुढील वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर अजय देवगणच्या चित्रपटासमोर दोन दिग्गजांचे आव्हान असेल. सुपर स्टार रजनीकांत आणि अक्षय कुमारच्या चित्रपटाला त्याला टक्कर द्यावी लागेल.  प्रेक्षक कोणत्या चित्रपटाला अधिक पसंती देणार हे पाहण्यासाठी आणखी काही वेळ प्रतिक्षा करवी लागणार आहे.  यंदाच्या  दिवाळीमध्ये प्रदर्शित झालेल्या अजय देवगणच्या  ‘शिवाय’ या चित्रपटासोबत करण जोहरचा बहुचर्चित ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.  यामध्ये करण जोहरच्या चित्रपटाने बाजी मारली होती. रोहित शेट्टीचा ‘गोलमाल ४’ च्या माध्यमातून अजय देवगण अक्षय कुमारला कशी टक्कर होईल हे पाहणे दोघांच्याही चाहत्यांसाठी पर्वणीच असेल.

रजनीकांत याच्या गाजलेल्या ‘रोबोट’ या चित्रपटाचा पुढील भाग (सिक्वेल) लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटात अभिनेता रजनीकांत तिहेरी भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटात अक्षयकुमार एका वेगळ्या रंगभूषेत दिसणार आहे. विज्ञानकथा असलेल्या या चित्रपटात रजनीकांत याने शास्त्रज्ञ आणि रोबोट अशा दोन भूमिका केल्या होत्या. चित्रपटाच्या पुढील भागात रजनीकांत आणखी एका भूमिकेत असेल. मूळ रोबोटला नष्ट करण्यासाठी चित्रपटातील शास्त्रज्ञ आणखी एक नवीन रोबोट तयार करतो. हे नव्या रोबोटची भूमिकाही रजनीकांत करणार आहे. या चित्रपटात अक्षयकुमार खलनायकाच्या भूमिकेत असून त्याच्या या भूमिकेविषयी आणि रंगभूषेबाबत चित्रपटसृष्टीत चर्चा सुरू आहे. अक्षयकुमार पहिल्यांदाच अशा वेगळ्या गेटअपमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे.  दिवाळीमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शिवाय’ या चित्रपटापेक्षा करण जोहरच्या बहुचर्चित ‘ऐ दिल है मुश्किल’ने टक्कर दिली होती. यामध्ये करण जोहरने बाजी मारली.