|| रेश्मा राईकवार

अक्षय कुमारचे चित्रपट, त्याची वास्तव आणि पारदर्शी राहणी, मनमिळाऊपणा, त्याची अ‍ॅक्शन, त्याचं मराठी बोलणं आणि मराठीवरचं प्रेम, पत्नी आणि मुलांमध्येही तितकाच रमणारा कुटुंबवत्सल अभिनेता अशी त्याची असलेली प्रतिमा या सगळ्यामुळे तो कायम चर्चेत असतो. आताही एकीकडे लंडनमध्ये ‘हाऊसफुल्ल ४’ चित्रपटाचे चित्रीकरण करत असतानाही त्याचे लक्ष मायदेशी लागले आहे. ते त्याच्या दोन चित्रपटांमुळे.. ‘गोल्ड’ हा त्याचा रीमा कागती दिग्दर्शित चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होतो आहे, मात्र त्याच्याआधी या आठवडय़ात त्याची निर्मिती आणि प्रस्तुती असलेला ‘चुंबक’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘चुंबक’ची कथा-अभिनय आवडल्याने निर्मितीची जबाबदारी खांद्यावर घेणाऱ्या या अभिनेत्याने हिंदीत अजूनही तितके चांगले चित्रपट करता येत नाहीत, कारण तिथले निर्माते बोल्ड आशयाला घाबरतात, असे मनमोकळेपणे सांगितले.

हिंदी चित्रपट निर्मात्यांच्या या भीतीचा अनुभव एक अभिनेता म्हणून स्वत:ही कित्येकवेळा घेतल्याचे तो सांगतो. ‘मी ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ केला तेव्हा माझे सगळेच इंडस्ट्रीतले मित्र घाबरले होते. टॉयलेट वगैरे काय? अरे चित्रपटाच्या नावातच टॉयलेट आहे. लोक काय विचार करतील तू हे असे चित्रपट करतो आहेस. त्यांनी मला नकोच करू असं सांगितलं होतं. पण मला कथा आवडली, मी केला तो चित्रपट. ‘पॅडमॅन’ आहे.. आजवर कोणीच सॅनिटरी पॅडवर चित्रपट केलेला नाही. तुम्ही बघा कोणी असा प्रयत्न केला होता का? जगात कोणी असा चित्रपट बनवलेला नाही. पण आपण असे चित्रपट करायला हवेत’, असं तो म्हणतो. लोकांना ही गोष्ट कळायला पाहिजे असं वाटत असेल तर ते चित्रपट केले पाहिजेत, लोकांसमोर आणले पाहिजेत. तिथे घाबरायचं नाही. ही खुबी मराठी चित्रपटात आहे आणि म्हणूनच त्याला मराठी चित्रपट आवडतात, असं तो स्पष्ट करतो.

‘चुंबक’च्या आधी त्याने दोन मराठी चित्रपटांची निर्मिती केली होती, पण त्यानंतर तितक्या चांगल्या पटकथा मिळाल्या नाहीत, असं त्याने सांगितलं. चांगला चित्रपट हा शेवटी नशिबात असावा लागतो, असं म्हणतानाच तो ‘चुंबक’चे उदाहरण देतो. हा चित्रपट पाहिला, त्याची कथा आवडली, स्वानंद किरकिरेबरोबरच संग्राम देसाई आणि साहिल जाधव या दोन नवीन कलाकारांचं काम खूप आवडलं. ते काम प्रेक्षकांनी पाहायलाच हवं असं मला वाटतं आणि म्हणूनच मी या चित्रपटाला स्वत:चे नाव देण्याचा निर्णय घेतला, असं तो म्हणतो.

‘प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दोन मार्ग असतात. त्यातला एक बरोबर असतो, तर दुसरा चुकीच्या दिशेने नेणारा असतो. त्यातला तुम्ही कोणता निवडताय हे तुमच्यावर अवलंबून असतं. या एका गोष्टीवर ‘चुंबक’ बेतला आहे. त्यात मला या चित्रपटाचा जो नायक आहे स्वानंद किरकिरे यांचं काम खूपच आवडलं. मी २८ वर्षे या इंडस्ट्रीत काम करतो आहे, माझा इतक्या वर्षांचा कामाचा प्रचंड अनुभव असतानाही मी कुठल्याच व्यक्तीला इतकं प्रभावी काम करताना पाहिलेलं नाही. मला काही या चित्रपटातून पैसा कमवायचा नाही. यातलं नफा-तोटय़ाचं गणित मी बघणार नाही. मला फक्त हे काम लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. अभिनय काय चीज असते हे लोकांनी बघायला पाहिजे. ते या चित्रपटातून लोकांना पाहायला मिळेल आणि तेवढय़ासाठी मला हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे. मी आजवर किती चित्रपट निर्मिती केली आणि प्रस्तुत केले, पण त्यांना अक्षय कुमार हे नाव कधीच दिलेलं नाही. पण या चित्रपटाला मी माझं नाव दिलं आहे’, असं अक्षय म्हणतो. इतकंच नाही तर आपल्याला जे काम इतक्या वर्षांच्या कारकीर्दीत जमलं नाही ते स्वानंद किरकिरे यांनी त्यांच्या पहिल्याच चित्रपटात केलं आहे, असंही त्यानं सांगितलं.

‘स्वानंदने या चित्रपटात जी भूमिका केली आहे ती जर मला कोणी देऊ केली तर मी ती करूच शकणार नाही. इतक्या ताकदीने त्याने ती पडद्यावर साकारली आहे. त्याने भूमिका केली नाही, तो स्वत: तसाच आहे असं वाटावं इतकं सहजपणे  त्यानं काम केलं आहे. स्वानंदची ओळख गीतकार म्हणून आहे, त्याने लेखन केलं आहे, संगीत दिलं आहे, त्याने गाणी गायली आहेत. म्हणजे तो सतत कॅमेऱ्यामागचा यशस्वी कलाकार राहिला आहे आणि तरीही पहिल्या चित्रपटात त्याने इतकी अप्रतिम भूमिका केली याचं कौतुक वाटतं’, असं अक्षय सांगतो. मराठी चित्रपटांमध्ये जो आशय आहे तो इतर कुठल्याच भाषेतील चित्रपटांमध्ये बघायला मिळत नाही, असं अक्षय म्हणतो. ‘चुंबक’चा दिग्दर्शक संदीप मोदी, निर्माता म्हणून अक्षय कुमार अशी अमराठी मंडळी या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली आहेत.. असं म्हणताच अमुक एक हिंदी आहे, मराठी नाही असा विचार आपण करू नये, असं अक्षय म्हणतो. मी पंजाबी आहे म्हणून मी काय मराठी चित्रपट करू शकत नाही का? मी महाराष्ट्रात राहून मराठी शिकलोच ना.. असा उलट         सवाल तो करतो. कसंतरी का होईना, पण मी मराठी भाषा शिकलो, असं सांगत ज्याला जे आवडतं त्याने ते केलं पाहिजे, मग भाषा कुठलीही असली तरी फरक पडत नाही, हेही तो आवर्जून सांगतो.

तीसएक वर्ष या इंडस्ट्रीत काढल्यानंतर आता कशाचीच भीती वाटत नाही, असं तो म्हणतो. एक कलाकार म्हणून सुरुवातीच्या काळात आपल्याला अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळख मिळाली. पण ती आपल्याला नको होती, असं त्यानं स्पष्ट केलं. ‘हा काय अ‍ॅक्शन करतो, असं लोक म्हणायचे. मी ‘फक्त’ अ‍ॅक्शन करतो. ‘फक्त’ नाही.. मी सगळं करू शकतो. मला रोमँटिक आणि अ‍ॅक्शन चित्रपटांशिवाय तेव्हा दुसरी कसलीच संधी दिली जायची नाही. पण नंतर नंतर मी ‘धडकन’ वगैरेसारखे रोमँटिक चित्रपट केले, मग विनोदी चित्रपट केले. हळूहळू जसं यश मिळत गेलं तशी मी माझी प्रतिमा बदलत गेलो. मला आज जेव्हा लोक म्हणतात, अरे तुझी कोणतीच प्रतिमा नाही. तू विनोदी करतो, अ‍ॅक्शन करतो, चरित्र करतो.. सगळंच करतोस. त्यांचं ते मत मला आवडतं. मी सगळं करू शकतो, ही माझी खरी ओळख आहे. एका कलाकाराने असंच वैविध्यपूर्ण काम करत राहिलं पाहिजे’, असं अक्षय सांगतो. आत्तापर्यंत त्याने पन्नास वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबर काम के लं आहे. आधीचे दिग्दर्शक आणि आत्ताचे दिग्दर्शक यांच्या विचारसरणीतही कमालीची तफावत असल्याचे त्याने सांगितले. ‘आधीचे दिग्दर्शक अगदी तद्दन व्यावसायिक चित्रपट बनवायचे. ते माँग मे सिंदूर, हाथ मे चुडी.. अशा सगळ्या कल्पना होत्या. तुम्हाला समजतंय मला काय म्हणायचं आहे ते. आत्ताचे खूप वास्तवदर्शी चित्रपट बनवतात. त्यामुळे हे चित्रपट करणं हा पूर्णपणे वेगळा अनुभव आहे’, असं तो सांगतो. आत्तापर्यंत अनेक प्रथितयश दिग्दर्शकांबरोबर त्याने काम केलं असलं तरी सध्या जे नव्या दिग्दर्शकांचं पीक आलं आहे त्यांच्या सगळ्यांबरोबरच काम करायचं आहे’, असं तो म्हणतो. ‘मला त्यांच्याबरोबर काम करायला आवडतं. खूप अभिनव कल्पना घेऊन येतात ते आपल्यासमोर. त्या कलाकार म्हणून करायला खूप आवडतं’, असं सांगणाऱ्या अक्षयने आपण हिंदीतही जाणीवपूर्वक वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट करत असल्याचं सांगितलं. ‘पॅडमॅन’ झाला. आता ‘गोल्ड’ हा खेळावर आधारित आहे. त्यानंतर ‘केसरी’सारखा वास्तव घटनेवर आधारित असलेला चित्रपट करतो आहे. हिंदीत अभिनेता म्हणून दर्जेदार आशय असलेले चित्रपट करण्याचा, आणण्याचाच हा माझा प्रयत्न आहे आणि यापुढेही मी तो करत राहीन, असं त्यानं आत्मविश्वासानं सांगितलं.

मी मराठी चित्रपट खूप पाहतो. मराठीतील ‘बालक पालक’ आणि रितेश देशमुखचा ‘लय भारी’ हे दोन चित्रपट मला खूप आवडले. ‘लय भारी’ पूर्ण व्यावसायिक चित्रपट आहे, पण तरीही मला तो आवडला. मात्र ‘बालक पालक’सारखा चित्रपट हिंदीत बनूच शकणार नाही. कारण हिंदी निर्मात्यांना तो चित्रपट प्रौढांसाठीचाच आहे असं वाटणार. त्या चित्रपटात जे मांडलं आहे ते समजून घ्यायचं बाजूलाच राहील. पण त्यात ब्ल्यू फिल्म्सचा उल्लेख आहे, त्या फिल्म्स मुले पाहतायेत असं दाखवलं आहे, हे त्यांना पटणारच नाही. पडद्यावर ते चांगलं दिसणार नाही असंच त्यांना वाटतं आणि ते सरळ हे करायचंच नाही, अशी भूमिका घेऊन मोकळे होतात. स्पष्टपणे सांगायचं तर हिंदीतले निर्माते अजूनही घाबरतात. जरा बोल्ड आशय असेल तर तो पडद्यावर आणायची त्यांना भीती वाटते.     – अक्षय कुमार