अयोध्येतील राम मंदिरासाठी निधी उभारण्यासाठी अनेक संस्थांनी काम हाती घेतलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते काही महिन्यांपूर्वीच अयोध्येमध्ये राम मंदिराचं भूमिपूजन पार पडलं. त्यानंतर आता देशभरातील वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संस्थांनी या कामासाठी निधी गोळा करण्यास सुरुवात केलीय. त्यातच अभिनेता अक्षय कुमारनेही राम मंदिरासाठी योगदान दिल्याची माहिती ट्विटरवरुन दिलीय. मात्र यावरुन आता तो ट्रोल होत असून तो पब्लिसीटी स्टंट असल्याचे अनेकांनी म्हटलं आहे.

अक्षयने त्याच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून ट्वीट करत राम मंदिर उभारण्यासाठी योगदान केल्याचं सांगितलं आहे. अयोध्येत श्री राम यांच्या भव्य मंदिराचे बांधकाम सुरू झाले आहे ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. आता निधी देण्याची वेळ आली आहे. मी सुरुवात केली आहे, आशा आहे की तुम्ही पण योगदान कराल. जय सियाराम,”असं ट्वीट करत अक्षयने एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. अक्षयचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

या ट्वीटवरून अक्षय ट्रोल होत आहे. एका नेटकऱ्याने अक्षयच्या जुन्या मुलाखतीचे आर्टिकल शेअर करत रामजन्मभूमीवर आधारित एक चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले आहेत. त्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीच हे योगदान अक्षयने दिल्याचा आरोप अनेकांनी केलाय. अन्य एका नेटकऱ्याने, खोटारड्या किती पण नाटक कर पण आम्ही तुझे चित्रपट पाहणार नाही असं म्हटलं आहे. तू सांगितल्याने आम्ही निधी देणार नाही असं एकाने म्हटलं आहे. अन्य एकाने अक्षयच्या या स्टंटबाजीला विरोध असल्याचे सांगतानाच मी रामाच्या प्रेमापोटी योगदान दिल्याचे म्हणत ऑनलाइन ट्रान्झेक्शच्या पावतीचा फोटो शेअर केला आहे.