अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. आता या चित्रपटाच्या शीर्षकावरून नवा वाद सुरू झाला आहे. करणी सेनेनं चित्रपटाच्या टीमला कायदेशीर नोटीस पाठवली असून नाव बदलण्याची मागणी केली आहे. लक्ष्मी देवतेचा अपमान केल्याचा आरोप करणी सेनेनं केला आहे.
श्री राजपूत करणी सेनेकडून वकील राघवेंद्र मेहरोत्र यांनी ही नोटीस पाठवली आहे. चित्रपट निर्मात्यांनी जाणूनबुजून ‘लक्ष्मी’ हे नाव शीर्षकात वापरल्याचा उल्लेख या नोटिशीत केला आहे. हिंदू धर्मातील देवदेवतांचा अपमान केल्यामुळे भावना दुखाविल्याचं त्यात म्हटलं आहे.
आणखी वाचा : “इथे केलेला कचरा सोबत घेऊन जा”; गोव्याच्या मंत्र्यांचा करण जोहरला दम
‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटात अक्षय कुमार व कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत. यात अक्षय एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट येत्या ९ नोव्हेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शनाची तारीख इतक्या जवळ असताना आता निर्माते शीर्षक बदलतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.