सध्याच्या काळात कलाकारांपेक्षा त्यांच्या मुलांची म्हणजेच स्टारकिडची चर्चा रंगत असल्याचं पाहायला मिळतं. बरेचसे स्टारकिड हे सतत लाइमलाइटमध्ये येत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर या मुलांची कायम चर्चा असते. मात्र या सगळ्यांपासून खिलाडी कुमारचा मुलगा आरव कायम दूर राहत असल्याचं दिसून येतं. आज आरवचा वाढदिवस असून अक्षयने खास अंदाजात त्याच्या मुलाला शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रसारमाध्यम आणि कलाविश्वापासून लांब असणारा आरव आज त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करत असून अक्षयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच त्याच्या लहानपणीचा एक फोटोदेखील शेअर केला आहे.

“हा दिवस आज आला यावर विश्वास बसत नाही. माझ्या मुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तू लहान असो किंवा मोठा, मी कायम तुला असंच खांद्यावर उचलेन. जोपर्यंत तुझ्यावर मला उचलण्याची वेळ येत नाही तोपर्यंत मी तुला असंच उचलेन. आता तुझी उंची तर माझ्यापेक्षा जास्त झाली आहे. माझ्यापेक्षा जास्त हॅण्डसम दिसायला लागला आहेस. इतकंच नाही तर माझ्यापेक्षा दहापटीने जास्त तू उदार, मोठ्या मनाचा आहेस. त्यामुळे नक्कीच तुझ्यामुळे या जगाचा काही तरी फायदा होईल”, अशी पोस्ट अक्षयने शेअर केली आहे.

दरम्यान, अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांना आरव व नितारा अशी दोन मुलं आहेत. आरव हा मोठा मुलगा असून २००२ मध्ये त्याचा जन्म झाला. तर नितारा ही अक्षयची लहान मुलगी आहे. विशेष म्हणजे अक्षयची दोन्ही मुलं कायम प्रसारमाध्यमांपासून लांब राहत असल्याचं दिसून येतं.