काळा कोट, वकिली रुबाब, कोर्ट, खटला आणि या सर्वाला बनारसची पार्श्वभूमी असलेल्या ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता जवळ आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि काही प्रमोशनल व्हिडिओ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. नुकताच या चित्रपटाचा आणखी एक ट्रेलर अक्षय कुमारने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या ट्रेलरमध्येही ‘जॉली’च्या नजरेतून न्यायसंस्थेचे वेगळेच दर्शन घडत आहे.

एका किचकट खटल्यामध्ये काही महत्त्वाचे धागेदोरे शोधण्यासाठी येणाऱ्या अडचणी, त्या अडचणींवर मात करणारा ‘जॉली’ आणि त्याच्या वाटेमध्ये अडथळा बनून येणारे काही लोक यावर हा ट्रेलर भाष्य करतो. ‘आय विल सी यु इन कोर्ट..’ ही ओळ या ट्रेलमध्ये अनेकांचेच लक्ष वेधत आहे. या ट्रेलरमध्ये अभिनेते अन्नू कपूर आणि अक्षय कुमारच्या प्रभावी अभिनयाची झलक पाहायला मिळतेय. त्यामुळे एका वकिलाच्या मार्गात कोणताही खटला लढवताना अगदी वाईट परिस्थितीही उद्भवू शकते याचा अंदाज हा ट्रेलर पाहिल्यावर येत आहे. ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणारा अभिनेता अक्षय कुमार शक्य त्या सर्व परिंनी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये त्याचे योगदान देत आहे. चित्रपटांच्या चित्रिकरणासोबतच सोशल मीडियावरही सक्रिय असणारा अक्षय कुमार त्याच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरुनही चित्रपटासंबंधीचे बरेच फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो.

दरम्यान, सुभाष कपूर दिग्दर्शित हा चित्रपट १० फेब्रुवारी २०१७ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षयचा हा आगामी चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जॉली एलएलबी’ या चित्रपटाचा सिक्वल आहे. अक्षय कुमार, हुमा कुरेशी आणि अन्नू कपूर यात मुख्य भूमिका साकारतील. त्यामुळे येत्या काळात अक्षयचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात यशस्वी होतो का…हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.