एखाद्या चित्रपटाचं कथानक जितकं महत्त्वाचं असतं तितकच त्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी निवड करण्यात येणाऱ्या ठिकाणांचंही फार महत्त्वं असतं. मुळात चित्रीकरणासाठी निवडण्यात येणारी ही ठिकाणंसुद्धा कथानक प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी कारणीभूत ठरतात. अभिनेता सलमान खानच्या आगामी चित्रपटासाठीसुद्धा सध्या अशाच ठिकाणाची रेकी करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे ज्या ठिकाणी चित्रपटाच्या टीमने भेट दिली ते ठिकाण पाहता चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढण्यास सुरुवात झाली आहे.

सलमानचा हा आगामी चित्रपट आहे ‘भारत’. गेल्या बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाच्या निर्मितीचं काम सुरु होतं ज्यामागोमाग आता स्टारकास्टची निवड झाल्यानंतर चित्रपटाच्या चित्रीकरणासाठीच्या ठिकाणांची पाहणी करण्याचं काम सुरु झालं आहे. खुद्द दिग्दर्शक अली अब्बास जफरनेच त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन याविषयीची माहिती दिली. अलीने एक फोटो पोस्ट करत आपण नेमकं कोणत्या ठिकाणची पाहणी केली यावरुन पडदा उचलला. भारताचा ७० वर्षांपूर्वीचा इतिहास शोधण्यासाठी आणि तो रुपेरी पडद्यावर मांडण्यासाठी अली आणि त्याची टीम थेट भारत- पाकिस्तान सीमेनजीक जाऊन पोहोचली आहे. या दोन्ही देशांच्या सीमांजवळ योग्य त्या ठिकाणाच्या शोधात अली तेथे पोहोचला आणि त्याने या ठिकाणचा एक फोटोही पोस्ट केला.

वाचा : UPSC results: मदरशातील शिक्षकाची यशोगाथा, जिंकली केंद्रीय लोकसेवा आयोगाची शर्यत

ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोमध्ये एक साइन बोर्ड दिसत असून, त्यावरील माहिती सर्वांचच लक्ष वेधत आहे. ‘इस्लामाबाद- ३२२ किमी, लाहोर- २४ किमी, भारत- पाकिस्तान सीमा- २ किमी’, असं त्या साइन बोर्डवर लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे त्याविषयी काही वेगळं सांगण्याची गरजच नाही. ‘भारत’च्या चित्रीकरणासाठी तेथीलच जवळपासचं ठिकाण निश्चित करण्यात आलं, तर सलमान थेट भारत- पाकिस्तान सीमेनजीक जाईल असंच म्हणावं लागेल. दरम्यान, भारतच्या निमित्ताने अली अब्बास जफर आणि सलमान तिसऱ्यांदा एकत्र आले आहेत. याआधी त्यांनी ‘सुलतान’ आणि ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटांसाठी एकत्र काम केलं होतं. ‘भारत’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. कारण, अभिनेत्री प्रियांका चोप्रासुद्धा बऱ्याच वर्षांनंतर या चित्रपटाच्या निमित्ताने सलमानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.