बॉलीवूडच्या आगामी ‘उडता पंजाब’ या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट साकारत असलेल्या बिहारी मुलीच्या व्यक्तिरेखेवरून आलिया आणि अभिनेत्री नीतू चंद्रा यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर नीतू चंद्राने खुले पत्र लिहून आलिया भट आणि दिग्दर्शक अभिषेक चौबे यांच्यावर जाहीरपणे टीका केली होती. या चित्रपटातील आलियाने साकारलेली बिहारी मुलीची भूमिका विशिष्ट साच्यातली असल्याचे नीतूने या पत्रात म्हटले होते.
नीतूच्या या टीकेला प्रत्युत्तर उत्तर देताना आलियाने म्हटले आहे की, माझ्या मते अनेकजण केवळ चित्रपटाचा ट्रेलर पाहून काही गोष्टी ठरवतात. त्यामुळे त्याविषयी उगाच काही बोलण्यापेक्षा गप्प राहणे जास्त चांगले आहे, असे मला वाटते. कारण, काही लोक केवळ ट्रेलर पाहून काही गोष्टी ठरवतात आणि ते कदाचित सत्य नसते, असे आलियाने म्हटले. टीका करणाऱ्यांनी कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी प्रथम चित्रपट बघावा. आपण नेहमी चित्रपट पाहण्यापूर्वीच अनेक गोष्टी ठरवतो. चित्रपटाचा ट्रेलर हा फक्त एक झलक किंवा पूर्वकल्पना असते. आम्ही जे काही करतो ते चित्रपट पाहिल्यानंतरच कळू शकते. त्यामुळे चित्रपट पाहिल्यानंतर लोकांच्या अशाच प्रतिक्रिया असतील ते समजण्यासारखे आहे. त्यामुळे टीकाकारांनी तुर्तास तरी चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहावी, असे आलियाने सांगितले.