जेव्हा विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक हे हल्ल्याचे बळी ठरतात, तेव्हा देशात सर्वकाही ठीक आहे असं भासवणं आता बंद केलं पाहिजे, अशा शब्दांत अभिनेत्री आलिया भट्टने जेएनयू तोडफोडप्रकरणी निषेध नोंदवला आहे. प्रत्येक दिवस हा त्रासदायक ठरतोय, देशात नेमकं चाललंय तरी काय, असा सवाल तिने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे उपस्थित केला.

हिंसाचार पसरवणारी, लोकांमध्ये फूट पाडणारी आणि दडपशाहीसाठी प्रोत्साहन देणारी कोणतीही विचारसरणी आपण ठामपणे नाकारली पाहिजे, असं मत तिने व्यक्त केलं. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आलियाने हे पोस्ट लिहिले. सध्याच्या परिस्थितीवर योग्य आणि शांततापूर्ण पद्धतीने तोडगा काढायला पाहिजे असंही तिने या पोस्टमध्ये लिहिलं.

आलियाने पोस्टमध्ये काय लिहिले?

जेव्हा विद्यार्थी, शिक्षक आणि शांततापूर्ण नागरिक हल्ल्याचे बळी ठरतात, तेव्हा देशात सर्वकाही ठीक आहे असं भासवणं आपण बंद केलं पाहिजे. आपल्या डोळ्यांसमोरील सत्याला सामोरं गेलं पाहिजे आणि आपल्याच घरात ताणतणाव आहे हे स्वीकारलं पाहिजे. आपली विचारसरणी एकमेकांपासून कितीही भिन्न असली तरी या समस्यांवर आपण तोडगा काढलाच पाहिजे आणि ज्या आदर्श तत्वांवर हा देश उभा आहे, ते तत्व पुन्हा अंमलात आणले पाहिजे.

आणखी वाचा : सोनाली म्हणते, ‘देशातील विद्यार्थ्यांना वाचवू शकत नाही आणि म्हणे..’

जेएनयू विद्यापीठ संकुलात १ आणि ४ जानेवारी रोजी झालेल्या तोडफोड प्रकरणीअनेक बॉलिवूड कलाकारांनी निषेध नोंदविला. अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने मंगळवारी सायंकाळी जेएनयू विद्यापीठाला भेट दिली आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.