आकाशवाणी, दूरदर्शनचे प्रक्षेपण सुरू होताना किंवा त्यांचे  विविध कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जी विशिष्ट संगीत धून वाजविली जाते त्याला ‘सिग्नेचर टय़ून’ असे म्हटले जाते. सिग्नेचर टय़ूनपासून सुरू झालेला हा प्रवास आता जाहिरातींची ‘जिंगल्स’वरून मालिकांची शीर्षक गीतांपर्यंत येऊन पोहोचला आहे. त्याचा हा धावता आढावा..

काही विशिष्ट प्रकारचे संगीत आपल्या मनात घर करून बसलेले असते. दूरचित्र वाहिन्यांची संख्या अफाट वाढण्यापूर्वी आधी आकाशवाणी व नंतर दूरदर्शन हीच मनोरंजनाची साधने होती. या दोन्हीचे कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी विशिष्ट प्रकारचे संगीत वाजविले जायचे. हे संगीत म्हणजे ‘सिग्नेचर टय़ूून.’ दूरदर्शन किंवा आकाशवाणीवरील अनेक कार्यक्रमांच्या सिग्नेचर टय़ून आजही मनात घर करून आहेत. आता दूरचित्र वाहिन्यांची व त्यावर सादर होणाऱ्या मालिकांचीही संख्या वाढली आहे. आत्ताच्या काळात ‘सिग्नेचर टय़ून’ हा प्रकार थोडासा लोप पावला असला तरी त्याची जागा आता मालिकांच्या शीर्षक गीतांनी घेतली आहे. चित्रपट गीत, लोकगीत किंवा भावगीता इतकीच ही मालिकांची शीर्षक गीते अमाप लोकप्रिय झाली आहेत.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
A new storyline series for the audience on the occasion of Gudi Padwa 2024
गुढी नव्या मालिकांची

एक काळ असा होता की, प्रत्येक मराठी घरातील सकाळ ही आकाशवाणीच्या ‘मंगल प्रभात’ या कार्यक्रमाने होत असे. पहाटे साडेपाच/पावणेसहा वाजता हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आकाशवाणीची सिग्नेचर टय़ून लागायची. आज अनेकांच्या दिवसाची सुरुवात आकाशवाणीच्या सिग्नेचर टय़ूनने होत नाही हे खरे आहे. मात्र असे असले तरी विशिष्ट सुरातील ही सिग्नेचर टय़ून आजही लोकप्रिय आहे. काही जणांच्या स्मार्ट भ्रमणध्वनीवर तिने ‘कॉलर टय़ून’ म्हणून स्थान प्राप्त केलेले आहे. यातच त्या सिग्नेचर टय़ूनचे महत्त्व व लोकप्रियता किती टिकून आहे ते पाहायला मिळते.

आकाशवाणीची ही लोकप्रिय सिग्नेचर टय़ून पं. रविशंकर, पं. व्ही. जी. जोग, ठाकूर बलदेव सिंह यांनी तयार केली असे म्हटले जात असले तरी ते तसे नाही. आकाशवाणीची ही सिग्नेचर टय़ून वॉल्टर कॉफमॅन यांनी तयार केली होती. १९३०च्या सुमारास कॉफमॅन हे मुंबई आकाशवाणी केंद्राच्या पाश्चिमात्य संगीत विभागात संगीतकार म्हणून काम करत होते. त्या वेळी त्यांनी ही सिग्नेचर टय़ून तयार केली असल्याची माहिती आहे. तंबोरा आणि व्हायोलिन या वाद्यांचा वापर यात करण्यात आलेला आहे.

आकाशवाणीवरील सर्वच कार्यक्रमांच्या सिग्नेचर टय़ून लोकप्रिय झाल्या. त्याची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. यात ‘आपली आवड’, ‘कामगार सभा’, ‘युववाणी’, ‘भावसरगम’, ‘वनिता मंडळ’ आदी कार्यक्रमांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. सकाळचे ठिक अकरा वाजले की आकाशवाणी मुंबई ‘कामगार सभा’ आणि त्यापाठोपाठ उद्घोषकाची ‘कामगारांसाठी’ अशी सूचना आणि मग कानावर यायची ती दिनकर अमेंबल यांनी संगीतबद्ध केलेली श्रवणीय ‘सिग्नेचर टय़ून.’ आकाशवाणीवरील अमाप लोकप्रिय ठरलेल्या ‘भावसरगम’ या मराठी भावगीतांच्या कार्यक्रमाची सिग्नेचर टय़ून ज्येष्ठ संगीतकार पं. यशवंत देव यांनी तयार केली आहे.

‘दूरदर्शन’च्या आगमनानंतर आकाशवाणी मागे पडली. ‘एफएम’ रेडिओच्या माध्यमामुळे तरुण पिढी पुन्हा एकदा आकाशवाणीशी जोडली गेलेली आहे. आता मुंबई दूरदर्शन केंद्राचे नामकरण ‘सह्य़ाद्री’वाहिनी असे झाले आहे. खासगी मनोरंजन वाहिन्यांवरील मालिकांच्या लोकप्रियतेच्या तुलनेत ‘सह्य़ाद्री’ मागे पडली आहे. खासगी मनोरंजन वाहिन्यांवरील मालिका ‘सह्य़ाद्री’वरील मालिकांपेक्षा जास्त पाहिल्या जातात, लोकप्रिय आहेत. मात्र असे असले तरी एक काळ दूरदर्शनच्या मालिकांनी गाजविला होता. सिग्नेचर टय़ूनची जागा आता मालिकांच्या शीर्षक गीतांनी घेतली आहे, असे म्हटले तर त्यात कोणतीही अतिशयोक्ती होणार नाही. मनोरंजन वाहिन्यांवरील मालिकांची शीर्षक गीते अमाप लोकप्रिय ठरली. आज खासगी मनोरंजन वाहिन्यांवरील मालिकांची शीर्षक गीते लोकप्रिय असली तरी त्याचा खरा पाया हा दूरदर्शनने घातला. अगदी सुरुवातीच्या काळातील ‘हमलोग’, ‘बुनीयाद’, सुरभि’, ‘मालगुडी डेज्’, ‘रामायण’, ‘महाभारत’ ही िहदी मालिकांची तर ‘गोटय़ा’, ‘संस्कार’ ‘दामिनी’, ‘महाश्व्ोता’, ‘परमवीर’, हॅलो इन्स्पेक्टर’, ‘स्वामी’ आदी मराठी मालिकांची शीर्षक गीते ही त्यातील काही ठळक उदाहरणे म्हणता येतील. ’गोटय़ा’ मालिकेचे ‘बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे बीयाणे रुजावे माळरानी खडकात’, ‘संस्कार’ मालिकेचे ‘तेज स्पर्शाने दूर होई अंधार जैसा मुळांचा वृक्षा असे आधार, शिल्पास आकारी जैसा शिल्पकार, मना घडवी संस्कार’ किंवा ‘स्वामी’ मालिकेचे ‘माझे मन तुझे झाले तुझे मन माझे झाले’ हे शीर्षक गीत आजही अनेकांच्या ओठावर आहे. संगीतकार व गायक श्रीधर फडके यांनी गायलेले ‘संस्कार’ मालिकेच्या शीर्षक गीताची फर्माईश आजही श्रीधर फडके यांना त्यांच्या गाण्याच्या कार्यक्रमात आजही केली जाते.

खासगी मनोरंजन वाहिन्यांची सुरुवात झाली आणि अल्पावधीतच तेव्हाच्या ‘अल्फा मराठी’ म्हणजेच आत्ताच्या ‘झी मराठी’ वाहिनीने दूरदर्शनला मागे टाकत मालिकांच्या क्षेत्रात आपला पाया भक्कम केला. या वाहिनीवरील पहिली महामालिका म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो ती म्हणजे ‘आभाळमाया.’ या मालिकेचे ‘उडतो तो जीव लागते ती आस बुडतो तो सूर्य उरे तो आभास, कळे तोच अर्थ उडे तोच रंग, ढळतो तो अश्रू सुटतो तो संग, दाटते ती माया, सरे तोच काळ, ज्याला नाही ठाव ते तर आभाळ, घननीळा डोह, पोटी गूढमाया, आभाळमाया’..हे देवकी पंडित यांनी गायलेले, मंगेश कुलकर्णी यांनी लिहिलेले आणि संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेले शीर्षक गीत अमाप लोकप्रिय झाले. खासगी मनोरंजन वाहिन्यांवरील आजच्या लोकप्रिय शिर्षक गीतांचा पाया ‘आभाळमाया’ने घातला असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

पुढे ‘झी मराठी’वरील जवळपास सगळ्याच मालिकांची शीर्षक गीते गाजली, रसिकांच्या ओठावर रुळली आणि अनेकांच्या स्मार्ट भ्रमणध्वनीची कॉलर टय़ून झाली. ‘झी मराठी’ पाठोपाठ ‘ई टीव्ही मराठी’ (आत्ताची कलर्स मराठी), ‘मी मराठी’ (या वाहिनीचे ‘मी मराठी, मी मराठी’ हे शीर्षक गीतच गाजले), ‘स्टार प्रवाह’ आदी मराठी मनोरंजन वाहिन्यांवरील अनेक मालिकांची शीर्षक गीते लोकप्रिय झाली. यात ‘राजा शिवछत्रपती’, अग्निहोत्र’ (स्टार प्रवाह), तसेच ‘अवंतिका’, ‘वादळवाट’, ‘आम्ही सारे खवय्ये’, ‘कळत नकळत’, ‘उंच माझा झोका’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘असंभव’, (सर्व झी मराठी) या सह अन्य विविध मालिकांच्या शीर्षक गीतांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. मालिकांच्या या शीर्षक गीतांनी रोहिणी निनावे, श्रीरंग गोडबोले, सौमित्र, गुरु ठाकूर, अरुण म्हात्रे, अश्विनी शेंडे, नीतीन आखवे असे चांगले तरुण गीतकारांबरोबरच अशोक पत्कींपासून ते नीलेश मोहरीर, राहुल रानडे अशा संगीतकारांची नावं घराघरात लोकप्रिय केली. तर देवकी पंडित, स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे, वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, रवींद्र साठे अशा गायक व गायिकांनी या शीर्षक गीतांना मोलाचे महत्त्व प्राप्त करून दिले आहे.

अवघ्या एक ते दीड मिनिटांच्या शीर्षक गीताला लोकप्रिय करणे आणि श्रोत्यांच्या ओठावर ते शीर्षक गीत सहज रुळेल हे खरे तर कठीण काम आहे. पण हे आव्हान ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्यासह अनेक संगीतकारांनी पेलले आहे. गाताना कठीण असल्या तरी सहज, सोप्या आणि मनात घर करून राहतील अशा चाली या सर्व संगीतकारांनी मालिकांच्या शीर्षक गीतांना दिल्या आहेत. काळानुरूप त्यात काही बदलही केले आहेत. त्यामुळेच ‘सिग्नेचर टय़ून’ची जागा आता या मालिकांच्या शीर्षक गीतांनी घेतली आहे.

शीर्षक गीतांचे सम्राट

तब्बल दोनशेहून अधिक मालिकांची शीर्षक गीते करणारे संगीतकार मालिकांच्या शीर्षक गीतांचे सम्राट आहेत. खासगी मनोरंजन वाहिन्यांच्या विश्वात महामालिकेचा ज्या  ‘आभाळमाया’ या मालिकेने पाया घातला त्या मालिकेच्या शीर्षक गीताचे संगीत अशोक पत्की यांचेच होते. आजवर त्यांनी संगीत दिलेल्या मालिकांची बहुतांश शीर्षक गीते लोकप्रिय ठरली आहेत. यात ‘अवघाची संसार’, ‘आम्ही सारे खवय्ये’, ‘वादळवाट’, ‘गोटय़ा’, ‘तुझ्याविना’ या आणि इतर अनेक मालिकांचा समावेश आहे. शीर्षक गीतांच्या जोडीनेच पत्की हे ‘जिंगल’ सम्राट म्हणूनही ओळखले जातात.