काही वर्षांपूर्वी अमर सिंह यांचे बच्चन कुटुंबाबरोबर अत्यंत घरोब्याचे संबंध होते. बच्चन कुटुंबाच्या प्रत्येक कौटुंबिक कार्यक्रमामध्ये अमर सिंह दिसायचे. अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नामध्ये तर, अमरसिंह यांचा वावर कुटुंबातील एका सदस्यसारखाच होता. पण पुढे हे संबंध बिघडत गेले. अमर सिंह यांनी जाहीरपणे बच्चन कुटुंबाबद्दलची आपल्या मनातली नाराजीची भावना बोलून दाखवली.

त्याच अमर सिंह यांना आता काही वर्षांनी उपरती झाली आहे. “अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल मी जास्तच बोललो. त्याबद्दल आज माझ्या मनात पश्चातापाची भावना आहे. मला खंत वाटत आहे” असे अमर सिंह यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे. ते समाजवादी पार्टीचे माजी नेते आहेत.

“आज माझ्या वडिलांचा स्मृतीदिन आहे, आजच मला अमिताभ बच्चन यांचा मेसेज आला. आयुष्याच्या या टप्प्यावर, जगण्यासाठी माझा संघर्ष सुरु असताना, अमितजी आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल मी जास्तच बोलून गेलो, त्याबद्दल मला खंत वाटते” असे अमरसिंह यांनी त्यांच्या टि्वटरवरील संदेशात लिहिले आहे.

काही वर्षांपूर्वी अमर सिंह यांना किडनीचा आजार असल्याचे निदान झाले. सध्या त्यांची प्रकृती खालावली असून, जगण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरु आहे.

अमिताभ यांच्याबद्दल काय म्हणाले होते अमर सिंह
“मैत्री संपवण्याचा निर्णय मी नाही, अमिताभ बच्चन यांनी घेतला. अमिताभ आणि जया बच्चन स्वतंत्र रहातात” असेही अमरसिंह म्हणाले होते.

“मी अमिताभ बच्चन यांना भेटण्याआधी ते आणि जया बच्चन स्वतंत्र राहत होते. एक प्रतिक्षा बंगल्यावर तर एक जनक बंगल्यावर राहत होता” असे अमर सिंह २०१७ साली एका मुलाखतीत म्हणाले होते. ऐश्वर्या राय आणि जया बच्चन यांच्यामध्ये मतभेद असल्याची शक्यता आहे आणि त्याला मी जबाबदार नाही असेही अमर सिंह यांचे म्हणणे होते.