५४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत लोकहितवादी मंडळ (नाशिक) या संस्थेच्या ‘न हि वैरेन वैरानी’ या नाटकास तीन लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले आहे. स्पर्धेतील अन्य पारितोषिकांवरही शिक्कामोर्तब करून या नाटकाने बाजी मारली आहे.
स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहात आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत अंकुर मानव समाज उत्थान केंद्र (नागपूर) या संस्थेचे ‘विठाबाई’ आणि ध्यास (पुणे) या संस्थेने सादर केलेल्या ‘परवाना’ या नाटकास अनुक्रमे दुसरे व तिसरे पारितोषिक मिळाले. या नाटकांसाठीची पारितोषिकांची रक्कम अनुक्रमे दोन लाख व एक लाख रुपये अशी आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकूण २१ नाटके सादर झाली. प्रेमानंद गज्वी, सुरेश मगरकर, संजीव वढावकर, अजय टिल्लू, मंगेश बनसोड यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
स्पर्धेचा अन्य निकाल पुढीलप्रमाणे
दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक (५० हजार रुपये), मुकुंद कुलकर्णी (न हि वैरेन वैरानी), नेपथ्याचे प्रथम पारितोषिक (१५ हजार रुपये), किरण समेळ (न हि वैरेन वैरानी), प्रकाश योजनेचे प्रथम पारितोषिक (१५ हजार रुपये), विजय रावळ ((न हि वैरेन वैरानी), रंगभूषेचे प्रथम पारितोषिक (१५ हजार रुपये), प्रशांत कुलकर्णी (एक चादर मैलीसी), संगीत दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक (१५ हजार रुपये), निषाद कुलकर्णी व प्रसाद भालेराव (न हि वैरेन वैरानी) दहा पुरुष आणि स्त्री कलाकारांची उत्कृष्ट अभिनयासाठी निवड करण्यात आली. प्रत्येकी १० हजार रुपये व रौप्यपदक असे याचे स्वरूप आहे.