अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हणून ओळखले जाते. त्यांच्या सारखी प्रसिद्धी व लोकप्रियता मिळवणे हे सिनेसृष्टीतील जवळपास प्रत्येक नवोदित कलाकाराचे स्वप्न असते. मात्र त्यांचा हा प्रवास इतका सोपा नव्हता. त्यांनाही कधीकाळी इतर कलाकारांप्रमाणेच नकारांचा सामना करावा लागला आहे. परंतु ४९ वर्षांपूर्वी पेट्रोल पंपावर घडलेल्या ‘त्या’ प्रसंगामुळे अमिताभ बच्चन पहिल्यांदा प्रकाशझोतात आले होते.

त्या वेळी काय घडले होते पेट्रोल पंपावर?

१९७१ साली अमिताभ बच्चन यांचा ‘आनंद’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटापूर्वी बिग बी सर्वसामान्य कलाकार होते. परंतु ‘आनंद’ या चित्रपटामुळे त्यांचे नशीब फळफळले. त्यावेळी हा चित्रपट खरं राजेश खन्ना यांच्यामुळे चर्चेत होता. मात्र चित्रपट प्रदर्शित होताच बॉलिवूडला अमिताभ बच्चन हा एक नवा नायक मिळाला होता.

त्या दिवशी बिग बी गाडीत पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गेले होते. त्यावेळी पहिल्यांदाच चाहत्यांनी त्यांना पाहाण्यासाठी खूप मोठी गर्दी केली होती. ही बातमी त्या नंतर सर्व वृत्तमाध्यमांमध्ये झळकली. आणि पाहाता पाहाता त्या एका घटनेमुळे अमिताभ बॉलिवूडचे नवे सुपरस्टार झाले. हा किस्सा बिग बींनी ट्विट करुन चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

‘आनंद’ हा चित्रपट १२ मार्च १९७१ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन हृषिकेश मुखर्जी यांनी केले होते. चित्रपटात राजेश खन्ना यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती.