अभिताभ बच्चन इण्डस्ट्रीतल्या अनेक कलाकारांच्या वाढदिवसादिवशी न चुकता त्यांना मेसेज करून शुभेच्छा घेतात. पण, गेल्या काही दिवसांपासून शुभेच्छांचे मेसेज पाठवूनही त्याबदल्यात कलाकारांकडून कोणताही प्रतिसाद येत नाही हे पाहून बिग बींनी शुभेच्छा पाठवण्यासाठी वेगळाच पर्याय स्विकारला आहे. कालच बॉलिवूडची ‘परी’ अनुष्का शर्मानं आपला ३० वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त देशभरातून चाहतेच नाही तर अनेक सेलिब्रिटींनी मेसेज, भेटवस्तू, शुभेच्छापत्र पाठवून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यात बिग बी तरी कसे मागे राहतील.

ज्या बड्या लोकांनी तिला शुभेच्छा दिल्या त्यांचे आवर्जून आभार तिनं मानले. पण बच्चन यांचे आभार मानायला मात्र ती विसरली. ‘अनुष्का मी तूला वाढदिवसादिवशी एसएमएस पाठवला होता. त्याचं काहीच उत्तर आलं नाही. ते म्हणाले की तू मोबाईल नंबर बदलला आहेस. तेव्हा पुन्हा एकदा तुला शुभेच्छा पाठवत आहे. कालच्या आयपीएल सामन्यामध्ये तू सुंदर दिसत होती. ‘ असं ट्विट करत बच्चन यांनी अनुष्काला शुभेच्छा पाठवल्याची आठवण करून दिली.अखेर बिग बींच्या शुभेच्छा अनुष्कापर्यंत पोहोचल्या. ‘माझा वाढदिवस लक्षात ठेवल्याबद्दल आणि शुभेच्छा पाठवल्याबद्दल धन्यवाद’ असं ट्विट करत तिनं बिग बींचे आभार मानले आहे.

बिग बींनी शुभेच्छा पाठवल्यात पण त्या कलाकारापर्यंत पोहोचल्याच नाही किंवा त्यांनी उत्तर दिलं नाही असं होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही रणवीर सिंग, सोनम कपूर, अक्षय कुमार यांना अमिताभ बच्चन यांनी शुभेच्छा पाठवल्या होत्या. त्या या ना त्या कारणानं त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच नव्हत्या. त्यामुळे आपण पाठवलेल्या शुभेच्छा संदेश संबधित व्यक्तीपर्यंत पोहोचला की नाही याची नेहमीच ते खातरजमा करून घेत असतात.