सिनेसृष्टीतील सर्वात मोठा बहुमान समजला जाणारा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ महानायक अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला आहे. सिनेसृष्टीत योगदानाबाबत हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराच्या घोषणेसोबतच अमिताभ यांचा ३७ वर्षांपूर्वीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ त्यांच्या गाजलेल्या ‘कुली’ या चित्रपटातील आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील त्यांच्यासोबत झालेला अपघात आणि यंदा त्यांना जाहीर झालेला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ यांचं खास कनेक्शन असल्याचं सांगण्यात येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अमिताभ यांना २४ सप्टेंबर रोजी दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. त्याप्रमाणेच ३७ वर्षांपूर्वी याच दिवशी अमिताभ बच्चन २ महिन्यांच्या उपचारानंतर घरी परतले होते. ‘कुली’च्या सेटवर त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सलग २ महिने उपचार घेतल्यानंतर त्यांना २४ सप्टेंबर रोजी घरी सोडण्यात आलं होतं. योगायोगाने ३७ वर्षानंतर याच दिवशी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.

दरम्यान, ‘सात हिंदुस्थानी’, ‘आनंद’, ‘रेश्मा और शेरा’, ‘गुड्डी’ हे अमिताभ बच्चन यांचे सुरुवातीच्या काळातले सिनेमा होते. १९७३ मध्ये आलेल्या ‘जंजीर’ या सिनेमामुळे त्यांची इमेजच बदलून गेली. हिंदी सिनेसृष्टीला ‘अँग्री यंग मॅन’ मिळाला. हा अँग्री यंग मॅन म्हणून जवळपास दोन दशकांहून अधिक काळ अमिताभ बच्चन वावरले. विजय खन्ना हे त्यांनी साकारलेलं पात्र हिंदी सिनेसृष्टीतला माईलस्टोनच म्हणता येईल. त्यानंतर मग ‘दीवार’, ‘शोले’, ‘जमीर’, ‘कभी कभी’, ‘हेरा-फेरी’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘अग्नीपथ’, ‘डॉन’, ‘शक्ती’, ‘शहेनशहा’ या सारख्या एकापेक्षा सरस चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं