‘कौन बनेगा करोडपती ९’ या शोच्या शूटिंगदरम्यान बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे डोळे पाणावले. एखाद्या स्पर्धकाची संघर्षकथा ऐकून नव्हे तर यामागे वेगळेच कारण होते. ११ ऑक्टोबर रोजी बिग बींचा ७५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने ‘केबीसी’च्या टीमने त्यांच्यासाठी एक विशेष सरप्राईज प्लॅन केले.

अमिताभ यांना भेट देण्यासाठी ‘केबीसी’ची टीम नैनीतालच्या ‘शेरवूड कॉलेज’मध्ये पोहोचली, जिथे बिग बींनी शिक्षण घेतले होते. तेथील काही शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळच्या काही आठवणींना बिग बींनी उजाळा दिला. सर्वांकडून मिळणाऱ्या या प्रेमामुळे, शुभेच्छांमुळे त्यांचे डोळे पाणावले.

वाचा : आरोप करणाऱ्याने पुरावे सादर करावे- हृतिक

‘केबीसी’च्या सेटवर केक कापला गेला आणि त्यानंतर टीमकडून आणखी एक विशेष भेट अमिताभ यांना देण्यात आली. बिग बींचे आवडते संगीतकार निलाद्री कुमार यांना ‘केबीसी’च्या सेटवर निमंत्रित करण्यात आलं. वाढदिवसानिमित्त त्यांनी बिग बींना संगीतमय शुभेच्छाही दिल्या. मागील सिझनप्रमाणेच ‘केबीसी’चा यंदाचा सिझनही चांगलाच गाजतोय. शोच्या टीआरपीमध्येही वाढ झाली आहे.