दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला आणि गायक मन्ना डे यांच्या प्रकृतीबाबत सुपरस्टार अमिताभ बच्चनने त्याच्या ब्लॉगवर चिंता व्यक्त केली आहे. वर्णभेदाविरुद्ध लढणा-या नेल्सन मंडेलांची प्रकृती अद्याप अस्थिर आहे. अमिताभ बच्चनने मंडेलांसोबतच्या आठवणींना उजाळा देतांना आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे की, मंडेला यांना प्रेमाने ‘मंडिबा’ असे संबोधतात. मंडेलांसोबत माझी त्यांच्या देशात दोनदा भेट झाली आहे. फारच सभ्य आणि निग्रही असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे आणि अशा व्यक्ति दुर्मिळ असतात. मंडेलांनी वर्णभेदाविरुद्ध आणि योग्य गोष्टींसाठी लढा दिला असून त्यासाठी २८ वर्षांचा तुरुंगवासही भोगला आहे.
छातीतील संक्रमणामुळे ज्येष्ठ गायक मन्ना डे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. अमिताभने मन्ना डे यांच्याबद्दलसुद्धा चिंता व्यक्त करत त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारण्यासाठी प्रार्थना करत असल्याचे सांगितले. मन्ना डे यांची गाणी प्रसिद्ध असून मधुशालामध्ये त्यांनी गायलेल्या गाण्याकरिता माझ्यासाठी आणि माझ्या परिवाराकरिता ते नेहमीच मौल्यवान राहतील, असे अमिताभने ब्लॉगवर म्हटले आहे.