18 October 2019

News Flash

..आणि असे झाले अमिताभ-जया यांचे शुभमंगल

त्यांच्या लग्नाची ही सहजसाधी गोष्ट ऐकताना अनेकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

अमिताभ बच्चन, जया बच्चन

बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध जोडप्यांच्या शुभविवाहाचे, प्रेमाचे किस्से आपल्याला ऐकून माहिती असतात, अनेकदा त्यांची वर्णने वाचलेली असतात. इंटरनेटवर त्यांची छायाचित्रे चाळलेली असतात. मात्र त्यांच्या या सुरस कथा त्यांच्याच तोंडून ऐकण्याचा योग तोही जाहीर कार्यक्रमात फार कमी वेळा येतात आणि अशी गोष्ट जर शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या लग्नाची असेल तर..

‘कौन बनेगा करोडपती’ या शोच्या एका खास भागात खुद्द अमिताभ यांना आपल्या लग्नाचा किस्सा ऐकवण्याचा मोह आवरला नाही. आणि गेली अनेक वर्ष जे जोडपं रसिकांच्या मनात घर करून आहे, त्यांच्या लग्नाची ही सहजसाधी गोष्ट ऐकताना अनेकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

केबीसीचा ‘करमवीर’ हा खास भाग या आठवड्यात प्रदर्शित होतो आहे. यात गेली कित्येक वर्ष गोरगरिबांसाठी दवाखाना चालवणाऱ्या डॉ. राव दाम्पत्याची भेट अमिताभ बच्चन यांनी घेतली आहे. केबीसीच्या सेटवर खास पाहुणे म्हणून आलेल्या या दाम्पत्याशी अमिताभ यांनी खूप गप्पा मारल्या. यावेळी डॉ. राव यांच्याशी नातं कसं जुळलं याचा किस्सा त्यांच्या पत्नीने सांगितला. ते ऐकल्यानंतर आपल्या लग्नाचा किस्सा ऐकवण्याचा मोह अमिताभ यांनाही आवरला नाही.

”मी आणि जया त्यावेळी जंजीर चित्रपटात एकत्र काम करत होतो. त्यावर्षी चित्रपट हिट झाला तर परदेशात फिरायला जाण्याचा बेत आम्ही आखला होता. मी लंडन कधीच पाहिले नव्हते आणि जयानेही पाहिले नव्हते. त्यामुळे जंजीर हिट झाला तर लंडनला फिरायला जाण्याचे आम्ही निश्चित केले. त्यानंतर मी माझ्या वडिलांना मित्रांबरोबर लंडनला जाणार असल्याचे सांगितले. त्यावर मी लंडनला कसा जाणार, कोणाकोणाबरोबर जाणार, असे प्रश्न त्यांनी विचारले. मित्रमैत्रिणींच्या यादीत जयाचे नाव ऐकल्यावर त्यांनी जायचे असेल तर विवाह करून जा, असे सांगितले आणि वडिलांची आज्ञा प्रमाण मानून दुसऱ्याच दिवशी लग्नाचा निर्णय घेत आम्ही लंडन गाठले”, असा किस्सा अमिताभ यांनी ऐकवला.

अमिताभ आणि जया बच्चन यांच्या लग्नाचा हा खरा किस्सा एरव्ही बाहेर आला नसता, मात्र असे काही प्रसंग आपल्याला आठवणींचा मोठा खजिना खुला करून जातात, यात शंका नाही.

First Published on September 15, 2019 12:45 pm

Web Title: amitabh bachchan shared his marriage story on kbc ssv 92