फॅनी चक्रीवादळ शुक्रवारी ओदिशाच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले. या वादळामध्ये १६ जणांचा मृत्यू झाला तर हजारो लोक बेघर झाले आहेत. परिस्थिती लक्षात घेत एनडीआरएफच्या पथकाने लाखो नागरिकांना तेथून स्थलांतरित केले. फॅनी चक्रीवादळामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ओदिशामधील स्थलांतरित लोकांना देशभरातून मदत सुरू आहे. यात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही मदत जाहीर केली आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

वादळाचा फटका बसलेल्या नागरिकांसाठी अमिताभ बच्चन यांनी मदत जाहीर केली असून इतरांनाही मदत करण्याचे अवाहन केले आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी एक कविताही पोस्ट केली आहे. त्या कवितेतून न खचण्याचा संदेश त्यांनी दिला आहे.

“चाहे जितना भी हो प्रचंड तूफ़ान हर तूफ़ान से लड़ेंगे हम, न अकेले तुमको छोड़ा था, न अकेले कभी छोड़ेंगे हम, जो घर उजड़ गए, उन्हें फिर से बसायेंगे हम, हर चोट पर मरहम लगाएंगे हम”, असा संदेश अमिताभ यांनी या कवितेतून दिला आहे.

दरम्यान, यापूर्वीदेखील अमिताभ यांनी नैसर्गिक आपत्ती ओढावलेल्या नागरिकांसाठी  मदतीचा हात पुढे केला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी बॉलिवूड शेहनशहा अमिताभ बच्चन यांनी मदतीचा हात दिला होता. अमिताभ बच्चन यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची आर्थिक मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.