अभिनेता अमिताभ बच्चन यांनी करोनावर मात केली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाल्याचं समजताच चाहत्यांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. परंतु, या काळात बिग बी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या प्रकृतीचे अपडेट देत होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अनेकांनी बिग बींचं कौतूक केलं. तर काहींनी मात्र त्यांना ट्रोल केलं. मात्र या ट्रोलर्सला बिग बींनी सडेतोड उत्तर दिलं आहे. यात एका महिलेला त्यांनी दिलेल्या प्रत्युत्तरामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांची चर्चा आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’नुसार, बिग बी करोनामुक्त झाल्यावर अनेकांनी त्यांना ट्रोल केलं. रुग्णालयात असताना ते नानावटी रुग्णालयाची जाहिरात करत होते असं काहींनी म्हटलं होतं. तर एका महिलेने थेट अमिताभ यांच्या संपत्तीवर भाष्य केलं. इतकी संपत्ती आहे, तर दान का करत नाही असा प्रश्न या महिलेने विचारला. त्यावर बिग बींनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे.

‘तुम्ही गरीबांमध्ये पैसे दान का करत नाही. मला खात्री आहे, तुमच्या पाकिटात भरपूर प्रेम आणि देवाची कृपा आहे.त्यामुळे तुम्ही एक आदर्श निर्माण केला पाहिजे. बोलणं सोप असतं, पण आदर्श निर्माण करणं कठीण असतं आणि ते तितकं महत्त्वाचंही आहे?”, असं म्हणत या महिलेने बिग बींना सुनावलं. परंतु, तिच्या या वाक्यामुळे बिग बींना चांगलाच राग आला.

“लॉकडाउनच्या काळात ५ हजार गरजुंना दुपारचं आणि रात्रीचं जेवण पुरवलं आहे. मुंबईतून गावी परतणाऱ्या जवळपास १२ हजार प्रवासी मजुरांमध्ये चप्पल, बुटांचं वाटप केलं आहे. युपी आणि बिहारमध्ये जाणाऱ्यांसाठी बसेसची सोय केली.इतकंच नाही तर २००९ मध्ये प्रवासी मजुरांसाठी संपूर्ण गाडी बुक केली होती”, असं बिग बी म्हणाले.

पुढे ते म्हणतात, “ज्यावेळी काही राजकीय कारणांमुळे गाड्या रद्द झाल्या होत्या. त्यावेळी इंडिगोच्या सहा विमानांच्या माध्यमातून १८० प्रवाशांना त्यांच्या घरी सोडलं होतं. १५ हजार पीपीई किट दिले आहेत.१० हजार मास्क दिले आहेत. तसंच गरजुंच्या मदतीसाठी दिल्लीतील शीख समुदायाच्या अध्यक्षांकडे काही रक्कम जमा केली आहे”.

दरम्यान, बिग बींनी केलेल्या प्रत्येक कार्याचा खुलासा या वेळी केला. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर बिग बींच्या या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. तसंच ट्रोल करणाऱ्यांचीही तोंड बंद झाल्याचं दिसून येत आहे.