महानायक अमिताभ बच्चन नेहमीच त्यांच्या कामामध्ये व्यग्र असतात. अनेक चित्रपटामध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारताना ते कारखान्यात काम करणारी भूमिकाही साकारताना दिसले आहेत. पडद्यावर काम करणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी आपल्या आयुष्यात वास्तवात काम करण्याचा अनुभव नुकताच घेतला. हा अनुभव घेताना त्यांनी  व्यग्र कामातून कुटुंबियांसाठी वेळ देणे महत्वाचे मानत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. आपल्या मुलीवर वेळोवेळी प्रेम व्यक्त करणाऱ्या अमिताभ यांनी श्वेता नंदानी या आपल्या मोठ्या मुलीच्या पतीच्या कारखान्यामध्ये काम करण्यासाठी चक्क दिल्लीला हजेरी लावली. अमिताभ बच्चन यांनी दिल्लीला येण्याचे कारण ट्विटरच्या माध्यमातून सांगितले. जावाई निखिल नंदा याच्या कारखान्यामध्ये काम करण्यासाठी दिल्लीला खास भेट दिली असे ते म्हणाले.

अमिताभ यांनी ट्विटर अकांऊटवरुन काही फोटो देखील शेअर केले होते. या फोटोमध्ये ते नव्या नंदा आणि अगस्त्या यांच्यासोबत दिसत आहेत. जावाई निखिल नंदा यांच्या कारखान्यात काम करण्याचा अनुभव देखील अमिताभ यांनी एका ब्लॉगच्या माध्यमातून शेअर केला आहे. अमिताभ याचे जावाई दिल्ली येथील एस्कॉर्ट्स कंपनीमध्ये व्यवस्थापकिय संचालक म्हणून कार्यरत आहेत. ही एक इंजनिअरिंग कंपनी आहे. या कंपनीमध्ये शेतीशी संबंधित यंत्रे, रेल्वेसाठीचे साहित्य तसेच वाहनांच्या साहित्यांची निर्मिती केली जाते. आजोबांसोबत कारखान्यामध्ये फिरताना नात नव्या आणि आगस्त्य ही दोघे फारच आनंदी दिसत आहेत.

बिग बींनी यापूर्वी अनेकदा आपल्या मुलीवरील प्रेम व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वीच मुलींचा सन्मान करा, असा संदेश देताना  त्यांनी श्वेता ही जगातील सर्वात सुंदर मुलगी असल्याचे म्हटले होते. श्वेताचा वडिल असल्याचा अभिमान वाटतोय. असेही अमिताभ म्हणाले होते.  श्वेता नंदा ही अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची मोठी मुलगी आहे. तिने व्यावसायिक निखिल नंदा याच्याशी १९९७ साली विवाह केला होता. त्यांना नव्या नवेली आणि अगस्त्या ही दोन मुले आहेत. मुलींवर प्रेम व्यक्त करणारे अमिताभ यांनी दिल्लीत जाऊन तिच्या पतीच्या कारखान्यावर काम केले. कुटुंबियांविषयी अमिताभ नेहमीच सजग असतात याची अनुभूती त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिली.