बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर छोटी का होईना एक तरी भूमिका करायला मिळावी, अशी सुप्त इच्छा मनात बाळगून असणारे अनेक कलाकार कालही होते, आजही आहेत. गेल्या काही वर्षांत खास अमिताभ यांच्यासाठी विविधांगी भूमिका लिहून घेणाऱ्या दिग्दर्शकांनी अनेक नव्या-जुन्या कलाकारांना अमिताभ यांच्याबरोबर एकत्रित काम करायला लावून वेगवेगळे प्रयोग के ले आहेत. यात अगदी नवीन आलेल्या तरुण कलाकारांनाही अमिताभ यांच्याबरोबर काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे, तर दुसरीकडे इम्रान हाश्मीसारख्या प्रस्थापित कलाकारची अमिताभ यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा ‘चेहरे’ या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण झाली आहे. अमिताभ हे आजही आपल्यासारख्या कलाकारांसाठी आदर्श आहेत, अशी भावना इम्रानने व्यक्त के ली आहे.

अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी यांच्यातील अभिनयाची, संवादाची जुगलबंदी पाहण्याची संधी प्रेक्षकांना रुमी जाफरी दिग्दर्शित ‘चेहरे’ या चित्रपटाच्या निमित्ताने मिळणार आहे. एक गुन्हा आणि त्या गुन्ह््याची उकल करता करता न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या दोन व्यक्तींची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाने अमिताभ यांच्याबरोबर काम कधी करायला मिळणार? याची प्रतीक्षा संपवली. एका अर्थी हा चित्रपट माझ्या कारकीर्दीतील मैलाचा दगड ठरला आहे, अशी भावना इम्रानने व्यक्त के ली. गेली पाच दशके  या चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून आपले अस्तित्व कायम राखणाऱ्या, रसिकांच्या मनातील आपली प्रतिमा, आदर कायम ठेवण्यात यशस्वी ठरलेला हा अभिनेता आजही सेटवर शिस्त पाळतो, ही गोष्ट आपल्याला जास्त भावली, असं इम्रानने सांगितलं. बॉलीवूड आणि शिस्त यांच्यातील व्यस्तच समीकरण अनेकदा अनुभवायला मिळतं. एक कलाकार म्हणून इतकी वर्षं काम करत असताना बेशिस्तीचा हा अनुभव अनेकदा खूप त्रासदायक ठरतो, असं तो म्हणतो. मात्र अमिताभ याला अपवाद ठरले आहेत. आजही ते वेळ पाळतात, सेटवर सांगितलेल्या वेळेत पोहोचतातच. त्यांची कामाप्रतिची ही निष्ठा, शिस्त सेटवरील सगळ्याच कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरते, असं त्याने सांगितलं.